राजस्थानपाठोपाठ मध्यप्रदेशमध्ये पेट्रोलची ‘शंभरी’ : देशात सलग दहाव्या दिवशी दरवाढीचे सत्र कायम
नवी दिल्ली/ वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आजही मुंबईत पेट्रोलमध्ये 29 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलही 31 पैशांनी वधारले आहे. दररोज पेट्रोल-डिझेल दर वाढत असल्यामुळे आता काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. बुधवारी राजस्थानमध्ये पेट्रोलने प्रतिलिटर शंभरचा आकडा गाठल्यानंतर गुरुवारी मध्यप्रदेशमध्येही प्रतिलिटर 100 रुपयांच्यावर पोहोचले. मध्यप्रदेशमध्ये पेट्रोल 34 तर डिझेल 32 पैसे प्रतिलिटरने महागल्यामुळे दराने आतापर्यंतची विक्रमी पातळी गाठली आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवे दर हे सकाळी 6 पासूनच लागू होतात. मुंबईत गुरुवारी पेट्रोल 96.32 रुपये आहे तर डिझेल 87.32 रुपये झाले होते. वाढत्या दरवाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर काही प्रमाणात नियंत्रणात आणून दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होताना दिसत आहे. या महिन्यात तब्बल 18 वेळा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आता दिल्लीत पेट्रोल 89.88 रुपये आणि डिझेल 80.27 रुपये प्रतिलिटर झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. सध्या बेंचमार्क कच्चे तेल 63 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचले आहे.









