5 हजारहून अधिक पेट्रोल पंपांसमोर निदर्शने : केंद्र सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांची टीका : दर कमी करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेंगळूर
पेट्रोल-डिझेल दरवाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेची लूट चालविली आहे. हे ‘पिकपॉकेट सरकार’ असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी सुरू असणाऱया ‘100 नॉटआऊट’ आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी राज्यातील 50 हजारहून अधिक पेट्रोल पंपांसमोर प्रदेश काँग्रेसच्यावतीने आंदोलन छेडण्यात आले. बेंगळूरमधील शिवानंद सर्कलजवळील पेट्रोल पंपासमोरील आंदोलनात सहभागी होऊन डी. के. शिवकुमार यांनी केंद्र सरकारविरोधात परखड टीका केली.
यावेळी ते म्हणाले, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे केवळ वाहने असणाऱयांनाच फटका बसलेला नाही, तर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले असून त्याचा भार सर्वसामान्य जनतेवर पडला आहे. केंद्र सरकार पिकपॉकेट सरकार असून त्यांनी जनतेच्या खिशावर बोजा टाकला आहे. तेलावरील करातून केंद्र सरकारने 20 लाख 60 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. मात्र, त्यातून विकासकामे न करता केवळ सरकारी तिजोरी भरली आहे, असा आरोप डी. के. शिवकुमार यांनी केला.
पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्व वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती एक-दोन रुपयांनी वाढल्या तर मुख्यमंत्री येडियुराप्पा आणि त्यांचे मंत्री गदारोळ माजवत होते. मात्र, केंद्रातील भाजप सरकारने जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 42 वेळा पेट्रोल-डिझेलची दरवाढ केली आहे. एप्रिलमध्ये निवडणुका नसल्याने दरवाढ केली नव्हती, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. तसेच पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदविताना रावणराज्यात (श्रीलंका) पेट्रोलचा दर 59 रुपये आहे. मात्र, रामराज्यात (भारत) 100 रुपयांवर गेला आहे. एका महिन्यात तब्बल 19 वेळा पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनतेची समस्या सरकारला दिसून आलेली नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्षातर्फे सरकारला सतर्क करण्यासाठी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. जनतेने देखील सरकारविरोधात आवाज उठवावा, अशी हाक दिली.
पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करा…
राज्य सरकारने राज्यातील जनतेला दिसाला देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करावा, अशी मागणीही सिद्धरामय्या यांनी केली. यापूर्वी केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रती बॅरेल 130 डॉलर इतकी होती. तेव्हा देशात पेट्रोल-डिझेलचे दर 70 रुपयांवर गेले नव्हते. आता कच्च्या तेलाचा दर प्रतीबॅरेल 70 रुपयांवर आला आहे, तरी सुद्धा पेट्रोलचा दर 100 रुपयांवर गेला आहे. त्यामुळे पक्षातर्फे पुढील पाच दिवस राज्यातील 5 हजार पेट्रोल पंपासमोर आंदोलन छेडण्यात येणार आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.









