नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या चार-पाच दिवसांपासून इंधन दरात सुरू असलेली वाढ अजूनही कायम आहे. शनिवारी सकाळी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांची दरवाढ केली. या दरवाढीमुळे गेल्या चार दिवसात पेट्रोल-डिझेल 3 रुपये 20 पैशांनी महाग झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात सुरू असलेला चढ-उतार आणि रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे ही दरवाढ होत असल्याचा दावा केला जात आहे.
नव्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 98.61 रुपये झाला आहे. तर, डिझेलचा दर 89.07 रुपयांवरून 89.87 रुपये प्रतिलिटर झाला आहे. 22 मार्चपासून चारवेळा इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. प्रत्येकी वेळी साधारणपणे प्रतिलिटर 80 ते 85 पैसे दरवाढ झाल्याने दोन्ही पेट्रोलियम उत्पादने जवळपास 3.20 रुपयांनी महाग झाल्याने वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यात पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ करण्यात आली नव्हती. मात्र, निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसात पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ जाहीर करण्यास प्रारंभ केल्याने वाहनधारकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडू लागला आहे.









