खानापुरात काँग्रेसची सायकल रॅली : दर कमी करा, अन्यथा खुर्च्या खाली करा
प्रतिनिधी /खानापूर
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या केलेल्या भरमसाठ दरवाढीच्या निषेधार्थ खानापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढून दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध केला. रॅलीची सुरवात जांबोटी क्रॉसवरील संत बसवेश्वर चौकातून झाली. रॅली महामार्गावरुन राजा शिवछत्रपती चौकात आली. यावेळी केंद्र शासनाचा निषेध करणाऱया घोषणा देण्यात आल्या. पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर कमी करा, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या दरात भरमसाठ दरवाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनाश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईमुळे गरिबाना जगणेही मुश्किल झाले आहे. यामुळे करण्यात आलेली दरवाढ तातडीने कमी करावी, अन्यथा खुर्च्या खाली कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन खानापूर ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी व ग्रामीण अध्यक्ष मधु कवळेकर यांनी सादर केले. निवेदनाचा स्वीकार करुन तहसीलदारांनी ते केंद्र शासनाला पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
सायकल रॅलीत काँग्रेस पक्षाचे जिल्हा संचालक महांतेश मत्तीकोप्प, प्रदेश काँग्रेसचे संयोजक रॉबर्ट ददापुरी, पुंडलिक निरलकट्टी, गुलाब बाळेकुंद्री, रायण्णा बळगप्पण्णावर, गुड्डुसाब टेकडी, अन्वर बागवान, विवेक तडकोड, भरतेश तोरोजी, अखिलसाब मुन्नोळी, परवय्या पुजार, अभिषेक शहापूरकर, मल्लेशी पोळ, अरुण बेळगावकर, पांडू पाटील, रामचंद्र पाटील, देमाण्णा गंगनायक, यल्लाप्पा जुवेकर, मंजू गोंधळी, फ्रान्सिस चोळणेकर, अनिता दंडगल, गीता अंबडकट्टी यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









