ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा परिणाम कच्च्या तेलांच्या किंमतीवर झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली असून, भारतात पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी दरवाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. या संभाव्य इंधन दरवाढीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”पटापट पेट्रोलची टाकी भरून घ्या. मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपत आलीय,” असं ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला होता.
दरम्यान, राहुल गांधींच्या या ट्विटनंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संभाव्य इंधन दरवाढीवर भाष्य केले आहे. पुरी म्हणाले, मागील काही महिन्यांपासून 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. ही मतदान प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. या कालावधीत इंधनाचे दर स्थिर होते. आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. भारतात अद्याप इंधनदरात वाढ झाली नाही. निवडणुकीमुळे आम्ही किंमती वाढवल्या नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. तेलाच्या किंमतीबाबत तेल उत्पादक कंपन्यांनीच निर्णय घ्यायचा आहे, कारण त्यांनाही बाजारात राहावे लागते. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार तेलाच्या किमती ठरतात.









