मुंबईत प्रतिलिटर 100.29 रुपयांवर – इंधन दरवाढीचा भडका कायम – पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसात इंधन दरात सातत्याने वाढ होत असल्याने पेट्रोलपाठोपाठ आता डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली. मुंबईत पेट्रोल 109.83 रु. प्रतिलिटर आणि डिझेल 100.29 रु. प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. मुंबईमध्ये शनिवारी प्रतिलिटर पेट्रोलच्या दरात 29 पैशांची आणि प्रतिलिटर डिझेलच्या दरात 37 पैशांची वाढ झाली. ऐन सणासुदीच्या उंबरठय़ावर इंधन आणि एलपीजी गॅसच्या दरात वाढीचे सत्र सुरू असल्याने सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शनिवारीही सलग पाचव्या दिवशी वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात साधारणपणे 30 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 35 पैशांनी वाढ केली आहे. सलग पाच दिवस त्यांच्या किमतीत वाढ झाल्याची फेब्रुवारीनंतरची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर या महिन्यात आठवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय तेल उत्पादनात सध्या घट झाल्यामुळे इंधनाच्या दरात वाढ झाल्याचा दावा केला जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यानंतर दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.84 रुपये आणि डिझेलची किंमत 92.47 रुपये प्रतिलिटरवर पोहोचली आहे. तसेच कोलकातामध्ये पेट्रोल 104.52 रु. प्रतिलिटर आणि डिझेल 95.58 रु. प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. चेन्नईत पेट्रोल 101.27 रु. प्रतिलिटर आणि डिझेल 96.93 रु. प्रतिलिटर दराने विकले जात आहे.
जगभरात कच्च्या तेलाची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याचेही पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे, परंतु, उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसून येते.
देशात बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोलने ओलांडली शंभरी
देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्रप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्यप्रदेश, छत्तिसगड, दिल्ली, नागालँड, पुदुच्चेरी, तेलंगणा, पंजाब, सिक्किम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्हय़ांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रतिलिटरच्या पार आहेत.
इंधनावर जीएसटी लागू करण्याला राज्यांचा विरोध आहे. पेट्रोल, डिझेलसह सर्व प्रकारच्या इंधनावर केंद्र सरकारचे कर आणि राज्यांचे कर लागू आहेत. प्रत्येक राज्याकडून इंधनावर वेगवेगळे कर लावले जातात. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होत आहे.









