बेळगावमध्ये पेट्रोल 96.3 तर डिझेल 88.17 रुपयांनी विक्री
प्रतिनिधी / बेळगाव
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात वाढ होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडू लागल्या आहेत. इतिहासात प्रथमच पेट्रोलची वाटचाल शंभरीकडे होवू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. शुक्रवारी बेळगावमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 96.03 तर डिझेल 88.17 रुपयांनी विक्री करण्यात येत होते.
मार्च महिन्यापर्यंत दररोज वाढणारे इंधनाचे दर एप्रिल महिन्यात स्थिर होते. देशात लोकसभा पोटनिवडणुकीसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका असल्याने दरवाढ थांबविण्यात आली होती. परंतु निवडणुका पार पडताच इंधन दरवाढीला पुन्हा एकदा सुरुवात झाली. दररोज 10 ते 20 पैशांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात येत आहे. यामुळे इंधनाचे दर शंभरीकडे वाटचाल करत आहेत.
आज प्रत्येकाजवळ दुचाकी तर बऱयाच जणांकडे चारचाकी आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची आवश्यकता असते. यापूर्वी कधीच वाढले नव्हते इतके दर वाढले आहेत. यामुळे वाहने बाहेर काढताना विचार करण्याची वेळ आली आहे. अवघ्या 6 दिवसांमध्ये बेळगावमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात 1 रुपयाने वाढ झाली. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असताना इंधनाची दरवाढ सुरू असल्याने सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येत आहेत.
वाहतुकीवर होतोय परिणाम
प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक डिझेलवर अवलंबून आहे. डिझेलचे दर नव्वदीकडे जात असल्याने वाहतूक खर्चातही वाढ होत आहे. वाहतुकीचा खर्च वाढल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या खिशावर होताना दिसत आहे. ही इंधन दरवाढ अशीच राहिल्यास सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे इंधनाचे दर नियंत्रित करण्याची मागणी होत आहे.









