गुगल, ऍपलसह मायक्रोसॉफ्टच्या एकाधिकारशाहीला टक्कर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने भारतीय डेव्हलपर्सच्या मदतीने आपला अँड्रॉईड मिनी ऍप स्टोअर लाँच केला आहे. सदरच्या पेटीएमच्या निर्णयामुळे ऍप स्टोअर क्षेत्रात अमेरिकेची गुगल, ऍपल आणि मायक्रोसॉफ्टच्या एकाधिकारशाहीला थेट आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. क्रीडाक्षेत्रातील बेटिंगच्या आरोपावरून 18 सप्टेंबर रोजी गुगलकडून पेटीएमला गुगल ऍप स्टोअरवरुन हटविण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सध्या उद्योग क्षेत्रातून बोलले जात आहे.
पेटीएमने दिलेल्या स्पष्टीकरणातून मिनी ऍप स्टोअर डेव्हलपर्सने आपली उत्पादनांची सुविधा मोठय़ा प्रमाणातील ग्राहकांपर्यंत पोहोचविणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये आतापर्यंत 300 पेक्षा अधिकच्या कंपन्या या मिनी स्टोअर ऍपला जोडले आहेत. यामध्ये डेकाथलन, ओला, रॅपिडो, नेटमेड्स, 1 एमजी, डोमिनोज पिझ्झा, प्रेश मेन्यू, नोब्रोकर यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
गुगलला टक्कर देण्याचा प्रयत्न
भारतीय स्टार्टअप्सच्या संस्थापकांनी एकजूट करत मागील सप्ताहात 50 पेक्षा अधिक स्टार्टअप्सचे संस्थापक भारतीय ऍप स्टोअरवर चर्चा करुन गुगलला आगामी काळात एकटे पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.









