हेरगिरी प्रकरणी पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची काँग्रेसची मागणी – संसद अधिवेशनाचा दुसरा आठवडा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मागील आठवडय़ात संसदेच्या दोन्ही सभागृहात गाजलेल्या पेगॅसस हेरगिरी प्रकरणानंतर आता चालू आठवडाही याच मुद्दय़ावर गाजण्याची चिन्हे आहेत. हेरगिरीसंबंधी पंतप्रधानांनी मौन सोडून सभागृहात स्पष्ट निवेदन करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी यासंबंधी भूमिका मांडली असून काँग्रेस पक्ष संसदेत पुन्हा यासंबंधी आग्रही भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री, राजकीय नेते, पत्रकार आणि सरकारी अधिकारी पातळीवरील सुमारे 300 भारतीयांवर पाळत ठेवण्यासाठी पेगॅसस स्पायवेअरचा वापर केल्याचा दावा करण्यात आल्याच्या वृत्तानंतर देशात खळबळ निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने एकतर पेगॅसस स्नूपिंगची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली यासंबंधीचा तपास व्हावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 2019 च्या निवडणुकीदरम्यान बेकायदेशीर हेरगिरी झाल्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला होता. संसदीय स्थायी समितीच्या माहिती तंत्रज्ञानाच्या तपासणीपेक्षा संयुक्त संसदीय समितीद्वारे (जेपीसी) चौकशी करणे अधिक प्रभावी ठरू शकते, असे प्रतिपादन चिदंबरम यांनी केले आहे.
यापूर्वी संसदेच्या आयटी पॅनेलचे प्रमुख शशी थरूर यांनी “हा विषय माझ्या समितीच्या आदेशावर आहे आणि जेपीसी आवश्यक नाही’’ असे भाष्य केले होते. यासंबंधी चिदंबरम यांना विचारले असता त्यांनी भाजप सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळे आयटी पॅनेल या प्रकरणाची संपूर्ण तपासणी करण्यास परवानगी देईल का याबाबत शंका व्यक्त केली.
राज्यसभा खासदाराची सर्वोच्च न्यायालयात धाव
‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यसभा सदस्य आणि सीपीआय-एमचे नेते जॉन ब्रिटस यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. इस्त्रायली स्पायवेअर पेगॅससच्या माध्यमातून राजकीय नेते, पत्रकार आणि सरकारी अधिकाऱयांची कथित हेरगिरी झाल्याचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ब्रिटस यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणामुळे भारतातील बऱयाच मोठय़ा लोकांमध्ये चिंता निर्माण झाली असून एकमेकांमधील मुक्त संवाद आणि अभिव्यक्तीवर त्याचा विपरित परिणाम होणार असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे. तसेच भारतीय लोकशाहीला कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.








