रेल्वेच्या विभागांमध्ये अडकली पॅसेंजर : इंजीन अद्याप यार्डातच : एक्स्प्रेसने प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांमधून नाराजी

प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी ते मिरज या दरम्यान धावणाऱया पॅसेंजर सुरू करण्याचा प्रस्ताव नैर्त्रुत्य रेल्वेने मध्य रेल्वेला पाठविला होता. परंतु या प्रस्तावाला अद्यापही मध्य रेल्वेने ग्रीन सिग्नल दिला नाही. त्यामुळे पॅसेंजर रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पॅसेंजर सुरू होण्यास विलंब असल्याने पॅसेंजरचे इंजीन अद्यापही यार्डातच आहे. रेल्वेच्या विभागांमध्ये पॅसेजर अडकली असून लवकर तोडगा काढून पॅसेंजर सुरू करण्याची मागणी होत आहे.
बेळगावमधून धावणाऱया पॅसेंजर या मध्य रेल्वेच्या पुणे विभागादरम्यान येतात. कोरोनापूर्वीच्या काळात हुबळी ते मिरज या दरम्यान एकूण 18 पॅसेंजर धावत होत्या. यातील काही पॅसेंजर कॅसलरॉक-मिरज, बेळगाव-मिरज, लोंढा-मिरज, हुबळी- मिरज या मार्गांवर धावत होत्या. त्यामुळे जिल्हय़ातील प्रवाशांना माफक दरात रेल्वे प्रवास करता येत होता. शेडबाळ, कुडची, रायबाग, गोकाक, घटप्रभा, खानापूर, लोंढा, कॅसलरॉक येथून दररोज शेकडो प्रवाशांची ये-जा असायची.
परंतु 2020 मध्ये मार्च महिन्यात झालेल्या लॉकडाऊनपासून पॅसेंजर बंद करण्यात आल्या. त्यानंतर बऱयाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर यातील केवळ दोन ते तीन पॅसेंजर सुरू झाल्या. परंतु त्यादेखील काही महिन्यातच बंद झाल्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना अधिक तिकीट दर देऊन एक्स्प्रेसने प्रवास करावा लागत आहे. मासिक पासही बंद करण्यात आल्याने दररोज तिकीट काढून प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेच्या केवळ दोनच पॅसेंजर
लॉकडाऊननंतरच्या काळात नैर्त्रुत्य रेल्वेने दोन पॅसेंजर सुरू केल्या. या दोन्हीही बेळगाव ते शेडबाळ या मार्गावर धावतात. यापैकी 07351 ही पॅसेंजर पहाटे 4 वा. बेळगाव येथून निघून सकाळी 6.30 वा. शेडबाळ येथे पोहोचते. पहाटे 4 वाजता पॅसेंजर सुरू असल्याने तिचा तितकासा उपयोग प्रवाशांना होताना दिसत नाही. तसेच बेंगळूर-बेळगाव ही एक्स्प्रेस बेळगाव ते शेडबाळ पॅसेंजर म्हणून चालविली जाते. तीदेखील काही दिवसांपासून दुरुस्तीमुळे बंद करण्यात आली आहे.
नैर्त्रुत्य रेल्वेच्या हद्दीत मध्य रेल्वेच्या पॅसेंजर
मिरज ते हुबळी या दरम्यान धावणाऱया पॅसेंजर या मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या आहेत. मिरजपासून काही अंतरावर मध्य रेल्वेची हद्द संपते. विजयनगर येथून नैर्त्रुत्य रेल्वेची हद्द सुरू होते. त्यामुळे पॅसेंजर सुरू करण्यास मध्य रेल्वे हिरवा कंदील देत नाही. तसेच नैर्त्रुत्य रेल्वेच्या दोन पॅसेंजर शेडबाळपर्यंतच धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या समन्वयातून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी असंख्य प्रवाशांमधून होत आहे.
परवानगी मिळताच पॅसेंजर सुरू करू
हुबळी ते मिरज या दरम्यान धावणाऱया पॅसेंजर मध्य रेल्वेच्या आहेत. त्यांना पॅसेंजर सुरू करण्याबाबत पत्र देण्यात आले असून त्यांच्याकडून परवानगी मिळताच पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
अनिश हेगडे
(जनसंपर्क अधिकारी, नैर्त्रुत्य रेल्वे)
दुर्लक्षामुळे प्रवासी अडचणीत
नैर्त्रुत्य रेल्वेची हद्द मिरजजवळच्या विजयनगरपर्यंत संपते. त्यामुळे हा विभाग पॅसेंजर सुरू करण्यास लक्ष देत नाही. मध्य रेल्वे मिरज, कोल्हापूरकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे प्रवासी मात्र अडचणीत सापडले आहेत. पॅसेंजर सुरू झाल्यास दररोज व्यवसाय, नोकरी, उद्योग, शिक्षण यासाठी ये-जा करणाऱयांची सोय होणार आहे.
अरुण कुलकर्णी
(रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य)









