विदेश मंत्री तुर्कस्तानात पोहोचले
वृत्तसंस्था
इस्रायलसोबत संघर्ष करणाऱया पॅलेस्टाइनला मदत करण्याचा निर्णय पाकिस्तानच्या सरकारने घेतला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात आतापर्यंत सुमारे 200 जण मारले गेले आहेत. पॅलेस्टाईनमधील उग्रवादी संघटना हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले केले जात आहेत. प्रत्युत्तरादाखल इस्रायलने हवाई हल्ले चालविले आहेत.
तत्पूर्वी पाकिस्तानने इस्रायलच्या विरोधात विधाने करत त्याला पॅलेस्टाईनवरील हल्ले रोखण्यास सांगितले आहे. पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी मंगळवारी तुर्कस्तानात पोहोचले आहेत. तुर्क अध्यक्ष रिसेप तैयप एर्दोगान आणि तेथील विदेशमंत्र्यांची भेट घेत इस्रायलच्या विरोधातील रणनीति तयार करण्याचा कुरैशी यांचा प्रयत्न आहे. तसेच पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ शुक्रवारी एकता दिन आयोजित करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
मुस्लीम देशांची संघटना ‘ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कंट्री’ म्हणजेच ओआयसी याप्रकरणी केवळ विधाने करत असताना पाकिस्तान आणि तुर्कस्तान विशेष सक्रीय दिसून येत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात इस्रायलच्या विरोधात प्रस्ताव आणण्याची त्यांची योजना आहे.









