वृत्तसंस्था/ कोलकाता
फ्रान्समधील पॅरिस येथे होणाऱया विश्व चषक स्टेज 3 तिरंदाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय तिरंदाजांना व्हिसा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय तिरंदाजी संघटनेच्या प्रवक्त्याने दिली.
पॅरिसमध्ये होणारी ही स्पर्धा भारतीय महिला तिरंदाजांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रिकर्व्ह विभागात भारतीय महिला तिरंदाजांना टोकिओ ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध करण्याची ही शेवटची संधी आहे. भारतीय तिरंदाज टप्प्याटप्प्याने पॅरिसला प्रयाण करणार आहेत. भारताच्या पुरुष सांघिक रिकर्व्ह प्रकारातील तिरंदाजपटू अतानू दास, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांना ऑलिम्पिक कोटय़ातून संधी मिळाली आहे. महिलांच्या विभागात भारताच्या दीपिका कुमारीने वैयक्तिक गटात ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे. कोरोना महामारी समस्येमुळे जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर भारताच्या तिरंदाजांना रिकर्व्ह प्रकारात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या एप्रिलमध्ये ग्वाटेमाला येथे झालेल्या विश्व चषक स्टेज वन तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी तीन सुवर्ण आणि एक कास्यपदक पटकाविले होते. त्यानंतर भारतीय तिरंदाजी संघाला स्वीस वकिलातीकडून व्हिसा नाकारल्याने लॉसेन येथे झालेल्या विश्व चषक तिरंदाजी स्टेज 2 स्पर्धेला मुकावे लागले होते.
पॅरिसमध्ये ऑलिम्पिक पात्रतेसाठीची तिरंदाजी स्पर्धा 18 आणि 19 जून रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे पॅरिसमध्येच स्टेज 3 तिरंदाजी स्पर्धा 21 ते 27 जून दरम्यान घेतली जाणार आहे. या स्पर्धेत पात्र ठरणाऱया आघाडीच्या तीन संघांना टोकिओ ऑलिम्पिकचे तिकीट उपलब्ध होईल. पॅरीसमध्ये तिरंदाजांना 10 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवले जाणार आहे. भारतीय महिला तिरंदाज आणि साहाय्यक प्रशिक्षक यांचा एक गट शनिवारी पॅरीसला रवाना होईल तर पुरुष तिरंदाज 9 जून रोजी पॅरीसला रवाना होतील, अशी माहिती भारतीय तिरंदाजी संघटनेचे सरचिटणीस प्रमोद चंदुरकर यांनी दिली आहे.









