पॅरीस / वृत्तसंस्था
पॅरीसमध्ये 2024 मध्ये होणाऱया ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिंपिक स्पर्धांसाठी ‘शुभचिन्ह’ (मॅस्कॉट्स्) म्हणून फेंच राज्यक्रांतीत प्रेरणादायी ठरलेल्या पेजियन टोप्यांचा उपयोग केला जाणार आहे. या टोप्या फ्रान्स आणि अन्य काही युरोपियन देशांमध्ये ‘स्वातंत्र्य टोप्या’ म्हणूनही ओळखल्या जातात. फ्रान्सच्या राज्यक्रांतीमुळे केवळ त्या देशाचा नव्हे, तर जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. क्रीडाक्षेत्रातही सर्वंकष परिवर्तन घडविण्याचे सामर्थ्य आहे, हे दर्शविण्यासाठी प्रेंच राज्यक्रांतीत उत्साहवर्धक ठरलेल्या त्याच टोप्यांचा उपयोग करण्याची योजना आहे.
ही माहिती पॅरिस ऑलिम्पिकचे ब्रँड संचालक ज्युलियन मातिखिन यांनी सोमवारी दिली. या टोप्यांना आमच्या समाजात चिरस्थायी स्थान आहे, हे जगाला दाखवून दिले जाणार आहे. आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये शुभचिन्ह म्हणून मुख्यत्वे प्राण्यांचा उपयोग केला गेला आहे. जायंट पांडा हे शुभचिन्ह 2022 मध्ये चीनमध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकसासाठी निवडण्यात आले होते. फ्रान्सचा आत्मभाव प्रगट करण्यासाठी प्रेजियन टोपी निवडण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.









