कोरोना संकटावर मात करण्यासाठी सरकारचा निर्णय, भारताकडे 62 हजार टन साठा उपलब्ध,
8 ते 9 हजार टनांची करु शकतो निर्यात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पॅरॉसिटामॉल गोळय़ांच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यास केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. कोरोना संकट संपूर्ण जगावर घोंगावत असून त्याला आळा घालण्यामध्ये पॅरॉसिटामॉल गोळय़ांचाही काहीप्रमाणात उपयोग होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून पॅरॉसिटामॉलचा फॉर्म्युला निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र व्यापार संचालनालयाने (डीजीएफटी)ने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार पॅरासिटामॉलचा फॉर्म्युला म्हणजे फिक्सड डोस कॉम्बिनेशनसह तत्काळ निर्यातीसाठी मुक्त करण्यात आला आहे. फॉर्मास्युटिकल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष विनोद दुआ यांनी याबाबत शिफारस केल्यानंतर वाणिज्य मंत्रालयाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. सध्या भारताकडे सुमारे 62 हजार टन गोळय़ांचा साठा शिल्लक असून सर्वाधिक खपही भारताच आहे. कोरोनामध्ये पॅरासिटामॉल उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतात असणाऱया अनेक परदेशी नागरिकांनी या गोळय़ांच्या सेवनाला प्राधान्य देत आपली प्रकृती स्थिर राखली आहे.
कोरोनावरील उपचारासाठी सध्या निश्चित लस अथवा कोणतेही औषध डोस उपलब्ध नाही. तरीही मलेरियावरील हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉल काहीप्रमाणात उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे ज्या देशांमध्ये या औषधांची गरज आहेत त्यांना योग्य प्रमाणात औषध पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर या औषधाची खूपच मागणी आहे. सरासरी 2 हजार टन निर्यात होईल इतकी ही मागणी असून भारताकडे तेवढे औषध निर्माण करण्याची क्षमता आहे. सध्या भारताला सरासरी 62 लाख गोळय़ा दिवसाला लागता असे अनुमान आहे. त्या तुलनेमध्ये मोठा साठा भारताकडे आहे. याचा काळाबाजार होऊन निर्यात होऊ नये यासाठी सरकारने आगामी काही दिवसांमध्ये 8 ते 9 हजार टन म्हणजे सुमारे 400 कोटी रुपयांच्या पॅरासिटामॉल निर्यात करण्याचे ठरवले आहे. देशातील अग्रगण्य फार्मा कंपनी ग्रेन्युलकडे सध्या 1 हजार टन निर्यातची ऑर्डर असल्याचेही सांगण्यात आले.









