टोकियो / वृत्तसंस्था
नेमबाजी, जलतरण, बॅडमिंटनमधील सर्व इव्हेंट्समध्ये बुधवारी भारताच्या पदरी निराशा आली. दोनच दिवसांपूर्वी सुवर्ण जिंकणारी अवनी लेखरा मिश्र गटातील फायनलमध्ये पोहोचू शकली नाही, हा धक्का ठरला. याशिवाय, जलतरणपटू सुयश जाधव नियमाचा भंग केल्याने अपात्र ठरला. प्रमोद भगत व पलक कोहली या स्टार जोडीला बॅडमिंटनच्या मिश्र दुहेरीत पहिल्याच लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.
प्रारंभी, पॅरा-जलतरणपटू सुयश जाधवला पुरुषांच्या 100 मीटर्स ब्रेस्टस्ट्रोक एसबी 7 फायनलमध्ये अपयश आले. त्याला नियमाचा भंग केल्याने अपात्र ठरवले गेले. पॅरा-जलतरणातील 11.4.1 मधील नियमानुसार, पहिल्या ब्रेस्टस्ट्रोक किकनंतर व त्यानंतर प्रत्येक टर्ननंतर एक बटरफ्लाय किकला परवानगी असते. मात्र, 27 वर्षीय जाधवने टर्ननंतर एकापेक्षा अधिक फ्लाय किक घेतली असल्याचे आढळून आले. वयाच्या 11 व्या वर्षी विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने दोन्ही हात गमवावे लागलेल्या सुयशने यापूर्वी 2018 आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्ण तर 2016 जर्मन जलतरण चॅम्पियनशिपमध्ये 2 कांस्य, 1 रौप्य जिंकले आहे. येथे मात्र तो अपयशी ठरला.
या इव्हेंटमध्ये कोलंबियाच्या सेरॅनोने 1 मिनिट 12.01 सेकंद वेळेसह सुवर्ण जिंकले. रशियन पॅरालिम्पिक कमिटीच्या इगोर इफ्रोसिनिनाने 1 मिनिट 16.43 सेकंद वेळेसह रौप्य तर ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक कॉक्रेनने 1 मिनिट 16.94 सेकंद वेळेसह कांस्यपदक कमावले. जलतरणातील एस 7 क्लासमध्ये पायाची मर्यादित हालचाल असलेल्या किंवा एक वा दोन्ही पाय गमवावे लागलेल्या जलतरणपटूंचा समावेश असतो. जाधवला यापूर्वी 200 मीटर्स वैयक्तिक मेडले एसएम 7 इव्हेंटमध्ये प्रकृती अस्वास्थामुळे सहभागी होता आले नव्हते. आता तो शुक्रवारी 50 मीटर्स बटरफ्लाय एस 7 इव्हेंटमध्ये नशीब आजमावणार आहे.
मिश्र फायनलमध्ये पोहोचण्यात लेखराला अपयश
दोन दिवसांपूर्वी पॅरालिम्पिक्समध्ये भारताची पहिली महिला सुवर्णजेती ठरलेली अवनी लेखरा 10 मीटर्स एअर रायफल प्रोन एसएच 1 इव्हेंटमध्ये अंतिम लढतीत पोहोचू शकली नाही. लेखराचा 27 वा प्रयत्न अगदीच खराब स्वरुपाचा ठरला आणि यामुळे ती तिसऱया फेरीतून बाहेर फेकली गेली.
या इव्हेंटमध्ये जर्मनीच्या नताशा हिलट्रॉपने सुवर्ण, दक्षिण कोरियाच्या पार्क जिन्होने रौप्य तर युक्रेनच्या इरिना स्केतनिकने कांस्य जिंकले. पुरुष गटातील अन्य इव्हेंट्समध्ये सिद्धार्थ बाबू व दीपक कुमार अनुक्रमे 40 व 43 व्या स्थानी फेकले गेले. सिद्धार्थला 625.5 तर दीपकला 624.9 अंकांवर समाधान मानावे लागले.
भगत-कोहली सलामी लढतीत पराभूत
प्रमोद भगत व पलक कोहली ही भारताची मिश्र दुहेरीतील जोडी पहिल्याच फेरीत पराभूत झाली. बॅडमिंटन इव्हेंटमधील ब गटातील लढतीत त्यांना फ्रान्सच्या दुसऱया मानांकित ल्युकास मझूर व फॉस्टिन नोएल यांच्याकडून 9-21, 21-15, 19-21 अशा फरकाने पराभवाचा धक्का सोसावा लागला. ही लढत 43 मिनिटात निकाली झाली. ब गटात याशिवाय, सिरिपोंग व निपदा या थायलंडच्या जोडीचा समावेश आहे.
विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन भगतने एकेरीत आपल्या मोहिमेला विजयी प्रारंभ करताना आपलाच राष्ट्रीय सहकारी मनोज सरकारला 21-10, 21-23, 21-9 अशा फरकाने नमवले. ही लढत 56 मिनिटे चालली. त्याची पुढील लढत युक्रेनच्या ओलेक्सांद्रविरुद्ध होईल. मनोजची लढत उद्या क्रिकोव्हविरुद्ध होणार आहे.
पलक कोहलीची अपयशाची मालिका महिला एकेरीतही कायम राहिली. महिला एकेरीत तिला जपानच्या अयाको सुझुकीने अवघ्या 19 मिनिटात 21-4, 21-7 अशा एकतर्फी फरकाने नमवले. पलक आता महिला दुहेरीत (एसएल 3-एसयू 5) पारुल परमारच्या साथीने नशीब आजमावणार आहे.









