मत्स्य व्यवसायमंत्र्यांचे आमदार वैभव नाईक यांना आश्वासन : अवैध पर्ससीनविरोधात कायद्याची कडक अंमलबजावणी करणार! : ‘त्या’ खलाशांना दहा दिवस क्वारंटाईन करणार!
प्रतिनिधी / मालवण:
सिंधुदुर्गवर माझे विशेष लक्ष असून आपल्या सांगण्यानुसार मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त मच्छीमारांना फायदा होईल, असे पॅकेज देण्यात आले आहे, असे मत्स्य विकासमंत्री अस्लम शेख यांनी आमदार वैभव नाईक यांच्याशी बोलताना स्पष्ट केले. आमदार नाईक यांनी मत्स्य विकासमंत्र्यांशी संपर्क साधून मच्छीमारांच्या मदतीच्या पॅकेजबद्दल आभार मानले. शिवसेना कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी नाईक यांनी मत्स्य विकासमंत्र्यांशी चर्चा केली. दरम्यान, शेख यांनी या पॅकेजमधून ज्यांना मदत मिळणार नाही, अशाही मच्छीमारांबाबत अधिवेशनात निर्णय घेऊ, असे आश्वासन आमदार नाईक यांना दिले आहे.
मालवण शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार केणी, किरण वाळके, प्रसाद आडवणकर, किसन मांजरेकर, महेंद्र पराडकर, संजय केळुस्कर, तेजस्वीनी कोळंबकर आदी मच्छीमार प्रतिनिधीही उपस्थित होते. पराडकर यांनी आमदार नाईकांच्या पाठपुराव्यामुळे मच्छीमारांना आर्थिक पॅकेज जाहीर झाल्याचे स्पष्ट केले.
मच्छीमारांना दिलासा
महाविकास आघाडी सरकारने मच्छीमारांसाठी 65 कोटींचे पॅकेज जाहीर करून मच्छीमारांना खऱया अर्थाने दिलासा दिला आहे, असे सांगत नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अस्लम शेख यांचे मच्छीमारांतर्फे आभार मानले. दरम्यान, मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. महाराष्ट्र सागरी हद्दीत घुसखोरी करून होणारी अवैध मासेमारी, बंदी कालावधीतील अवैध पर्ससीन मासेमारी, एलईडी लाईट मासेमारी बंद करण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली.
खलाशांसाठी दहा दिवसांचे क्वारंटाईन
मच्छीमार बांधवांचे सर्वाधिक प्रश्न, समस्या आपण विधिमंडळात मांडल्या. शासनाने त्याची वेळोवेळी दखल घेत न्याय देण्याचा प्रयत्न केला. मच्छीमाराना 90 ते 95 टक्के डिझेल परतावाही प्राप्त करून दिला आहे. आता जे पॅकेज जाहीर झाले, त्याचा लाभही मच्छीमारांना थेट पद्धतीने दिला जाणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुलभ करण्यासाठी, मच्छीमारांना माहिती प्राप्त होण्यासाठी तालुकास्तरावर व्यवस्था करण्यात येईल, असेही नाईक यांनी सांगितले. मालवणसह सिंधुदुर्गातील मासेमारी बोटींवर जे खलाशी अन्य राज्यांतून दरवर्षी या कालावधीत येतात. त्यांना येथे आल्यावर 10 दिवस क्वारंटाईन राहून तपासणी करून नंतर काम करता येणार आहे. प्रशासनाशी चर्चा केल्याचे नाईक यांनी सांगितले.
मालवणात सर्वाधिक 12 कोटी
मच्छीमारांचे प्रश्न नेहमीच आग्रहाने मांडणारे, प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणारे मच्छीमार नेते हरी खोबरेकर, बाबी जोगी, दिलीप घारे, छोटू सावजी व सर्वच मच्छीमार प्रतिनिधी, नेत्यांचेही श्रेय मच्छीमार पॅकेज मिळण्यात आहे. त्यामुळेच राज्याने जाहीर केलेल्या पॅकेजमधील सर्वाधिक 12 कोटी रक्कम तालुक्यातील मच्छीमारांना मिळणार आहे, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. लाभार्थी निवडीसाठी जिल्हा सहाय्यक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून हरी खोबरेकर यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी मच्छीमारांनी नाईक यांच्याकडे केली.









