वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
जगभरात सध्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग अत्यंत अधिक आहे. मागील वर्षी ही महामारी सुरू झाल्यावर याचे विषाणू पृष्ठभागाद्वारे फैलावून लोकांना संक्रमित करू शकतात असे अनुमान व्यक्त करण्यात आले होते. या भीतीपोटी लोक स्वतःच्या घराच्या तसेच कारच्या दरवाजांच्या हँडलना स्पर्श करणे टाळू लागले होते. पण आता अमेरिकेच्या तज्ञांनी पृष्ठभागाला स्पर्श केल्याने कुणाला कोरोनाची बाधा झाल्याचा कुठलाच पुरावा मिळाला नसल्याचा दावा केला आहे.
मागील वर्षी कोरोना महामारीच्या पृष्ठभागामुळे फैलावण्याचा संशय इतका अधिक होता की लोकांनी दरवाजे आणि रेलिंग्स पकडणेही बंद केले होते. फेसबुकने स्वतःच्या दोन कार्यालयांना डीप क्लिनिंगसाठी बंद केले होते. न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी दररोज रात्री मेट्रोची सफाई करत होते. भारतात दिल्ली मेट्रोमध्येही हीच स्थिती होती. येथेही अनेक महिन्यांपर्यंत मेट्रो बंद राहिल्यावर सेवा सुरू झाली असता दररोज त्याला डिसइंफेक्ट केले जात होते.
पृष्ठभागामुळे संक्रमणाचा धोका नाही
पृष्ठभागाला स्पर्श केल्याने संक्रमित होण्याप्रकरणी अमेरिकेची आरोग्य नियामक संस्था डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने मोठा खुलासा केला आहे. पृष्ठभागामुळे संक्रमित होण्याचा धोका 10 हजार लोकांमध्ये एक जण संक्रमित होण्यापेक्षाही कमी आहे. पृष्ठभागाला स्पर्श केल्याने कोरोनाची बाधा होण्याचा धोका प्रत्यक्षात खूपच कमी असल्याचे सीडीसीचे संचालक डॉ. रोसेल वेलेंस्की यांनी व्हाइट हाउसमध्ये ब्रीपिंगदरम्यान सांगितले आहे.
हवेतून फैलावतोय विषाणू
ही बाब खूप आधीपासूनच जाणतो, पण अद्याप लोक पृष्ठभागाला साफ करण्यावर अधिक लक्ष देत आहेत. दूषित किंवा संक्रमित पृष्ठभागाला स्पर्श केल्याने कुणाला कोरोना झाल्याचा कुठलाच पुरावा अद्याप मिळालेला नाही. हा विषाणू प्रामुख्याने हवेतूनच फैलावत असल्याची बाब आता अधोरेखित झाली आहे. कोरोनाचे ड्रॉपलस्स हवेत बराच वेळ राहतात. एखाद्या मानवाच्या संपर्कात आल्यास ते त्याच्या शरीरात शिरतात. याचमुळे कोविड संक्रमणाचा वेग वाढला असल्याचे व्हर्जिनिया टेकमधील एअरबोर्न डिसिजचे तज्ञ लिन्से मार यांनी स्पष्ट केले आहे.
वैज्ञानिक आधार नाही
पृष्ठभागाला स्पर्श केल्याने संक्रमण होण्याबद्दल वैज्ञानिक आधार नसल्यातच जमा आहे. या विषाणूमुळे तुम्ही श्वसनाद्वारे संक्रमित होऊ शकता, पण कुठल्याही पृष्ठभागाला स्पर्श केल्याने नाही असे रुटगर्स युनिव्हर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट इमॅन्युएल गोल्डमॅन यांनी म्हटले आहे.









