भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप
प्रतिनिधी / कराड
राज्याचे माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने ऐन दिवाळीत नोटीस बजावली आहे. 21 दिवसात स्वतः हजर राहून मागिल दहा वर्षातील संपत्तीचा खुलासा करावा, असा उल्लेखही नोटीसीत आहे. दरम्यान, केंद्रातील भाजपा सरकार सत्तेचा वापर करून विरोधकांवर दबाव आणत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, गेल्या वर्षी ऐन निवडणूक काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली होती. आता महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांपैकी माझा नंबर लागला आहे. नोटीशीवर प्रत्यक्ष हजर राहून म्हणणे मांडण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. माझा खुलासा प्रत्यक्ष अथवा वकिलांमार्फत दिलेल्या मुदतीत देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. राजकारणात काम करताना हे प्रकार नवीन नाहीत. अशा नोटीसा येतच असतात. मात्र सत्तेचा वापर कसा करायचा हे भाजपला जमते आहे.
बिहारच्या निवडणुकीवर बोलताना चव्हाण म्हणाले, चिराग पासवान यांना भाजपाचीच फूस होती. त्यांनी नितीशकुमार यांचे महत्त्व कमी करण्याचा डाव आखला होता. त्या माध्यमातून भाजपने नितीशकुमार यांचे महत्त्व कमी करण्याचा जो प्रयत्न केला तो यशस्वीही ठरला. त्यामुळे नितीशकुमार यांना पद मिळाले तरी ते काही दिवसांसाठी असेल आणि आता पूर्वीसारखे अधिकारही मिळणार नाहीत.
मराठा आरक्षणाच्या विषयावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे आवर्जून सांगत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या विषयाला फार जुना इतिहास आहे. भूमिहीन, अल्पभूधारक मराठय़ांना आरक्षणाची अत्यंत गरज आहे. मात्र हे ओळखून मी मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा कायदा मंजूर केला होता. मात्र कोर्टाने तो फेटाळला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छाशक्ती नसावी, त्यामुळे त्यांच्या सरकारनेही या कायद्यात काहीही बदल न करता तो परत मंजूर करुन तसाच पाठवला आणि तो कोर्टाने परत फेटाळला.
कोरोना संपला असे गृहित धरून बिनधास्त राहू नका असे सांगताना चव्हाण म्हणाले, जगात कोरोना लसीबाबत होत असलेल्या संशोधनाचे चित्र आशादायक आहे. मात्र प्रत्यक्षात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 7 अब्ज लोकांना लस टोचावी लागेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. देशात दिल्ली येथे कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. शेजारच्या राज्यातही रुग्ण वाढण्याची शक्यता असून यामुळे कोरोनाची दुसरी लाट केंव्हाही येऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडी सरकार भक्कम
भाजपाचे नेते महाविकास आघाडी सरकार आपोआप पडेल असे सांगत दिवास्वप्न पहात आहे. मात्र तीन पक्षांचे मिळून तयार झालेले हे सरकार भक्कम आहे. भाजपाच्या नेत्यांनी कितीही वाट पाहिली तरी महाविकास आघाडी सरकारला धोका नाही असेही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.









