अल्पसंख्याक तृणमूलसोबत- माकप कॅडर भाजपमध्ये दाखल
पूर्व वर्धमान जिल्हय़ातील भाटार, पूर्वस्थळी दक्षिण, पूर्वस्थळी उत्तर, कटवा, केतुग्राम, मंगलकोट, आसग्राम आणि गलसी या 8 मतदारसंघांमध्ये 22 एप्रिल रोजी मतदान आहे. येथील बहुतांश मतदारसंघांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 30 टक्क्यांच्या आसपास आहे. काही ठिकाणी तर 35 टक्क्यांपर्यंत आहे. हा समुदाय ममता बॅनर्जी यांच्यासोबत असल्याचे चित्र आहे. तर हिंदू मते तृणमूल आणि भाजपमध्ये विभागली जाऊ शकतात.
विशेष बाब म्हणजे माकपला समर्थन देणारे लोक यंदा भाजपच्या बाजूने दिसून येत आहेत. हे लोक तृणमूल काँग्रेसला धडा शिकवू पाहत आहेत. याचमुळे सर्व मतदारसंघांमध्ये भाजप आता तृणमूलच्या तुल्यबळ झाला आहे. पण माकपची मतपेढी पुन्हा आपल्याकडे परतावी यासाठी संयुक्त मोर्चा जोरदार प्रयत्न करत आहे. तर ध्रूवीकरणाचा प्रभाव गावांपर्यंत दिसून येत आहे. पूर्व वर्धमानच्या या 8 मतदारसंघांमध्ये तृणमूल अल्पसंख्याक मतांमुळेच काही प्रमाणात मजबूत दिसून येत आहे. पण स्थानिक नेतृत्वाबद्दलचा संताप, भ्रष्टाचार, कटमनी आणि ध्रूवीकरण हे घटक भाजपला बळकट करत आहेत.
कटवात तृणमूल मजबूत
कटवा या मतदारसंघात रविंद्रनाथ चटर्जी यांना तृणमूलने उमेदवारी दिली आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. 2016 मध्ये तृणमूलकडून त्यांनी निवडणूक लढवत विजय मिळविला होता. रविंद्रनाथ 4 वेळा आमदार राहिले असून कटवा येथे अत्यंत लोकप्रिय आहेत. लोक त्यांचे काम आणि वर्तन पसंत करतात.
केतुग्राममध्ये भाजपचे आव्हान
केतुग्राम येथे तृणमूलने विद्यमान आमदार शेख शाहनवाज यांनाच उमेदवारी दिली आहे. ते मागील दोनवेळा या मतदारसंघात विजयी झाले आहेत. शेख मुस्लिमांऐवजी हिंदूबहुल भागांवर अधिक लक्ष देत आहेत. हिंदू मते भाजपच्या दिशेने वळण्याची भीती त्यांना सतावत आहे. शेख यांना भाजपच्या मथुरा घोष यांच्याकडून आव्हान मिळत आहे.
ध्रूवीकरणाचा प्रभाव
भाटारमध्ये ध्रूवीकरणाचा प्रभाव स्पष्ट दिसून येत आहे. तर मंगलकोट मतदारसंघात तृणमूलने विद्यमान आमदार चौधरी सिद्दीकुल्लाह यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्याविरोधात मतदारसंघात वातावरण निर्माण झाले होते. तर सिद्दीकुल्लाह यांनीच पराभवाच्या भीतीने मतदारसंघ बदलण्याची मागणी केली होती असे जाणकारांचे म्हणणे आहे. तृणमूलने त्यांच्याजागी अपूर्वा चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे राणाप्रताप गोस्वामी यांच्याकडून त्यांना तीव्र आव्हान मिळत आहे.
बाहुबली अन् राजकारण
केतुग्राम आणि मंगलकोट या मतदारसंघांमध्ये राजकीय हिंसाचाराचा इतिहास राहिला आहे. येथे सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांनी बाहुबलींना सामील केले आणि त्यांच्याच माध्यमातून सत्ता चालविली आहे. तृणमूल काँग्रेसनही हीच परंपरा कायम ठेवली. जिल्हय़ातील 8 मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेस वरचढ दिसून येतेय कारण येथे अल्पसंख्याक मते अधिक आहेत. पण ध्रूवीकरणाने येथील समीकरणे यंदा बदलली आहेत. बहुतांश मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. काही मतदारसंघांमध्ये तृणमूलमधील गटबाजी चव्हाटय़ावर आली असून हे गट परस्परांना पराभूत करण्यासाठी भाजपला समर्थन देत आहेत. गावांमध्येही परस्परांमधील भांडणापोटी काही मुस्लीम भाजपला विजयी करू पाहत आहेत, कारण ते दुसऱया गटाला पराभूत होताना पाहू इच्छित आहेत.









