रिप्रॉडक्शन दरात घट : अनेक राज्यांच्या स्थितीत सुधारणा
अमेरिकेच्या मिशिगन युनिव्हर्सिटीच्या कोव-इंड अध्ययन गटानुसार मागील एक आठवडय़ापासून कोरोनाचा रिप्रॉडक्शन रेट 1 पेक्षा खाली आहे. याचाच अर्थ एक बाधित सरासरी एकपेक्षाही कमी लोकांना संक्रमित करत आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत पहिल्यांदाच रिप्रॉडक्शन रेट 1 च्या खाली आला आहे आणि याच पातळीवर राहिला आहे. जर रिप्रॉडक्शन रेट किमान 2 आठवडय़ापर्यंत 1 च्या खाली राहिल्या स्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले जाऊ शकते.
मिशिगन युनिव्हर्सिटीच्या ऍपनुसार भारतात महामारीपासून कोरोनाचा रिप्रॉडक्शन रेट 21 सप्टेंबर रोजी सर्वप्रथम 1 च्या खाली आला होता. विषाणूच्या आलेखात निश्चितच एक आशादायक कल आहे. राष्ट्रीय आकडेवारी पाहता चाचण्यांमध्ये मोठी वृद्धी झाल्याचे मिशिनगन युनिव्हर्सिटीतील महामारी शास्त्राचे प्राध्यापक भ्रमर मुखर्जी यांनी म्हटले आहे.
भारत कोरोनाला किती चांगल्याप्रकारे नियंत्रित करण्यास सक्षम आहे हे रिप्रॉडक्शन रेट सातत्याने 1 च्या खाली राहिल्यास निश्चित होणार आहे. विशेष बाब म्हणजे भारतात चाचण्यांचे प्रमाण वाढल्यावर रिप्रॉडक्शन रेटमध्ये घट झाली आहे. मागील 7 दिवसांमध्ये भारताचा रिप्रॉडक्शन रेट 1 च्या खाली राहिला आहे. देशभरात या 7 दिवसांमध्ये एकूण 75 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.
अधिक रुग्ण असलेल्या
राज्यांमध्ये चांगले संकेत
कोरोनाच्या रिप्रॉडक्शन रेटमधील घसरणीतून सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांमध्येही रिप्रॉडक्शन रेट अत्यंत कमी असल्याचे दिसून आले आहे. 26 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार भारताच्या सुमारे 14 मोठय़ा राज्यांमध्ये आता रिप्रॉडक्शन रेट 1 च्या खाली आहे. यानुसार भारतात रिप्रॉडक्शन रेटची राष्ट्रीय सरासरी 0.96 आहे. तर 9 राज्यांमध्ये हा आकडा राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे.
महाराष्ट्रातही कमी
महाराष्ट्रात रिप्रॉडक्शन रेट 0.93 नोंदविण्यात आला असून हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे. देशातील 22 टक्के रुग्ण महाराष्ट्रात असताना ही स्थिती आहे. महाराष्ट्रात 100 बाधित 93 नव्या लोकांना संक्रमित करत असल्याचा यातून अर्थ निघतो. अशाप्रकारे विषाणूचा वेग मंदावला आहे. मोठय़ा राज्यांमध्ये आंध्रप्रदेशात नीचांकी रिप्रॉडक्शन रेट 0.85 नोंद झाला आहे. यानंतर उत्तरप्रदेश 0.87 आणि हरियाणात 0.88 इतका दर आहे. पंजाबात 0.90, कर्नाटकात 0.91, छत्तीसगडमध्ये 0.91 आणि जम्मू-काश्मीर 0.91, आसाममध्ये 0.94 आणि झारखंडमध्ये 0.94 इतका दर राहिला आहे.
केरळमधे दर अधिक
दिल्ली, बिहार, तेलंगणा आणि तामिळनाडूत रिप्रॉडक्शन रेट 1 पेक्षा कमी आहे. परंतु या राज्यांमध्ये हे प्रमाण 0.96 च्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. केरळ एकवेळ महामारी नियंत्रित करण्यास यशस्वी ठरला होता, परंतु तेथील स्थिती आता खराब झाली आहे. केरळमधील कोरोनाचा रिप्रॉडक्शन रेट 1.35 पर्यंत पोहोचला आहे. याचाच अर्थ केरळमध्ये एक बाधित एकापेक्षा अधिक जणांना संक्रमित करत आहे. केरळमध्ये मागील 4 दिवसांपासून 6 हजारपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत.
काही राज्यांमध्ये चिंताजनक
पश्चिम बंगालमध्ये मागील महिन्यात दरदिनी सुमारे 3 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तेथेही रिप्रॉडक्शन रेट 1 इतका आहे. याचाच अर्थ तेथे एक संक्रमित एका नव्या व्यक्तीला बाधित करत आहे. ओडिशात हा दर 1.06 तर गुजरातमध्ये 1.04 आणि राजस्थानमध्ये 1.09 तसेच मध्यप्रदेशात 1.08 इतरा राहिला आहे.
पॉझिटिविटी रेट
बहुतांश राज्यांमध्ये रिप्रॉडक्शन रेट 1 पेक्षा कमी असला तरी तेथे टेस्ट पॉझिटिविटी रेट (टीपीआर) अधिक आहे. टीपीआरची राष्ट्रीय सरासरी आता खालावू लागली आहे. तर अनेक राज्यांमध्ये अद्याप हे प्रमाण 5 टक्क्यांच्या मर्यादेच्या वर आहे. महाराष्ट्रात रिप्रॉडक्शन रेट 0.93 आहे तर टीपीआर 20 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
देशात 6 महिन्यांपासून उत्पात माजविणारी महामारी आणि आतापर्यंत 60 लाखांहून अधिक रुग्ण झाल्यावर अखेरीस काही दिलासादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. आकडेवारीतून कोरोना विषाणूचा रिप्रोडक्शन रेट म्हणजे आर व्हॅल्यू नियंत्रणात आहे. रिप्रोडक्शन रेट या संज्ञेचा अर्थ यात संक्रमण दर असा होतो. कोरोना विषाणूच्या फैलावाची क्षमता दर्शविण्याची ही एक पद्धत आहे.
भारतात कोरोनाचा रिप्रॉडक्शन रेट 1 पेक्षा कमी
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा रिप्रॉडक्शन रेट 1 पेक्षा खाली असल्याने कोरोनाच्या फैलावाचा वेग कमी झाला आहे.