प्रतिनिधी/ वरकुटे
वीज वितरण कंपनीने वरकुटे व परिसरातील कृषीसाठीचा वीज पुरवठा अचानक बंद करुन शेतकऱयांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.
वीज वितरण कंपनीने यापूर्वीही या परिसरातील कृषीसाठीचा वीज पुरवठा बंद करुन वीज बिलातील काही रक्कम भरुन घेतली होती. पण त्यावेळी त्याची पूर्व कल्पना शेतकऱयांना देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱयांनी बिले भरल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. यावेळी मात्र वीज वितरण कंपनीने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता व वीज बीलेही न देता वीज पुरवठा बंद केल्याने शेतकरीवर्गात नाराजीचा स्वर निर्माण झाला आहे. याच परिस्थितीत राज्यातील काही पक्षांचे नेते शेतकरी वर्गाला वीज बीलेही माफीची आश्वासने देत आहेत बातम्यांच्या, व्हॉटस्ऍपच्या माध्यमातून त्या क्लीपा मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत असल्याने प्रत्येक शेतकऱयाला वाटते की आपण बील भरल्यानंतर शासनाने जर वीज बील माफी दिली तर आपणास त्याचा लाभ मिळणार नाही.
त्यामुळे आपणही बीले लगेच भरु नयेत. याचा अनुभव अनेक शेतकऱयांनी घेतला आहे. जिल्हा बँकेने सोसायटय़ांच्या माध्यमातून शेतकऱयांना दिलेले कर्ज मार्च अखेरपर्यंत भरले तर त्यांना 50 हजार रूपयांचे सानुग्रह अनुदान देऊ असे शासनाने जाहीर करूनही सानुग्रह अनुदान दिले नाही पण ज्यांनी कर्ज भरले नाही त्यांचे मात्र दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले.
या सर्व प्रकारामुळे शेतकरी साशंक असून आता वीज पुरवठाच बंद केल्यामुळे शेतकऱयांना वीज बील भरण्यावाचून पर्याय राहिला नाही.









