वार्ताहर / घटप्रभा :
पूर्ववैमनस्यातून दलित युवा वेदिकेच्या संस्थापक अध्यक्षाचा अज्ञाताकडून धारधार शस्त्राने खून झाल्याची घटना बुधवारी रात्री गोकाक येथे घडली. सिद्धू अर्जुन कणमडी (वय 27 रा. आदीजांबवनगर, गोकाक) असे त्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री 9 च्या सुमारास सिद्धू याच्यावर अज्ञातांनी धारधार शस्त्राने वार केला. तोंडावर मास्क लावून आलेले मारेकरी घटनेनंतर फरार झाले. सिद्धूला उपचारासाठी बेळगाव येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खबरदारी म्हणून गुरुवारी आयोजित केलेला गोकाकचा बाजार रद्द् केला. मृत हा एका संघटनेशी निगडीत असल्याने पोलिसांनी घटनेच्या चौकशीस प्रारंभ केला आहे. गुरुवारी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी गोकाकला भेट देऊन डीएसपी डी. टी. प्रभु यांच्याकडून माहिती घेतली. सीपीआय गोपाळ राठोड, सीपाआय व्यंकटेश मुरनाळ यांच्यासह परिसरातील पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.









