रंगपंचमी साजरी करताना आमदार विजय सरदेसाई यांचे उद्गार
प्रतिनिधी / मडगाव
कोविड महामारीमुळे मागील दोन वर्षांत जनजीवन विस्कळीत झाले. सण, उत्सव साजरे करण्यावर बंधने आली. अजूनही मास्क वापरणे आदी बंधने लागू आहेत. मात्र ही होळी या महामारीची राख करून सर्वसामान्यांच्या जीवनात नव्याने रंग भरेल व पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे सर्व कारभार सुरळीत होवो अशी दामबाबाच्या चरणी आपण प्रार्थना करतो, असे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.
फातोर्डातील दामोदर मंदिरात दामबाबाचे दर्शन घेतल्यावर त्यांनी तेथे उपस्थित असलेल्यांवर रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली. यावेळी त्यांच्या पत्नी उषा सरदेसाई, नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, अन्य नगरसेवक, माजी नगरसेवक रामदास हजारे उपस्थित होते. ब्रिटनच्या लंडन व अन्य प्रांतांमध्ये कोविडनंतर सर्व व्यवहार पूर्वीसारखे सुरळीतपणे सुरू झाले आहेत. तेथे सर्वांचे लसीकरण झाल्याने मास्क लावणे व अन्य बंधने काढून टाकली आहेत. गोव्यात व उर्वरित देशात आम्हाला अशा प्रकारे जनजीवन पूर्वपदावर आलेले लवकरच पाहायला मिळो अशी प्रार्थना दामबाबाच्या चरणी करूया, असे ते न्हणाले.
आमदार तुयेकरांकडून समर्थकांसह रंगपंचमी साजरी
दरम्यान, नावेलीतून प्रथमच निवडून येऊन आमदार बनलेले भाजपाचे उल्हास तुयेकर यांनी शुक्रवारी आपल्या समर्थकांसह रंगपंचमी साजरी केली. लोकांच्या जीवनात खुषी व आनंदाचे रंग ही रंगपंचमी भरू दे, असे ते म्हणाले. यावेळी भाजपाचे नावेली गटाध्यक्ष परेश नाईक, दिकरपाल पंचायतीचे पंच दीपक मंगलम व अन्य उपस्थित होते.
मडगावच्या पिंपळकट्टय़ावरही यंदा उत्साहात होळी साजरी करण्यांत आली. गुरुवारी रात्री होळी दहन करण्यात आले. त्यापूर्वी बुधवारी नृत्य स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व शुक्रवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली.









