मारिहाळ, बाळेकुंद्री खुर्द, सांबरा भागातील नागरिकांना दिलासा : तालुक्यातील प्रसिद्ध मारिहाळ येथील बकरी बाजाराला येणार ऊत
युवराज पाटील / सांबरा
तालुक्मयाच्या पूर्वभागातील आठवडी बाजार तब्बल आठ महिन्यांनंतर पूर्ववत झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या होत्या. सर्वत्र लॉकडाऊन करत सार्वजनिक कार्यक्रम, जत्रा, सण, उत्सव, जाहीर सभा आदींवर बंदी घातली होती. तर तालुक्मयात भरणाऱया आठवडी बाजारावरही निर्बंध घातले होते. त्यामुळे पूर्वभागातील मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, पंतनगर, सुळेभावी व मारिहाळ येथील आठवडी बाजार मार्च महिन्यापासून बंद होते.
मात्र, सध्या कोरोना रोगाचा विळखा हळूहळू सैल होत असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तर जिल्हा प्रशासनही कोरोना काळात लादलेल्या नियम व अटी शिथिल करत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. पूर्वभागामध्ये दर बुधवारी सुळेभावी व मारिहाळ येथे मोठा बाजार भरतो. हे दोन्ही बाजार सुरू झाले असून त्यापाठोपाठ दोन आठवडय़ापूर्वी सांबरा येथील बाजार सुरू करण्यात आला आहे. तर सोमवारपासून बाळेकुंद्री खुर्द येथील बाजारही सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.
पूर्वभागामध्ये भरणाऱया आठवडी बाजारांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील बाजारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने परगावचे अनेक व्यापारी येथे बाजारासाठी येतात. दर रविवारी मुतगा येथे भरणाऱया बाजाराला तर बसवण कुडची, निलजी, मुतगा, शिंदोळी, बसरीकट्टी, कलखांब, मुचंडी, चंदगड, अष्टे आदी गावातील लोक हजेरी लावतात. बाळेकुंद्री खुर्द येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. या बाजाराला वायुदल केंद्रातील जवानांच्या कुटुंबीयांसह पंचक्रोशीतील लोक हजेरी लावतात तर दर बुधवारी सुळेभावी व मारिहाळ येथे भरणारा आठवडी बाजार तालुक्मयात प्रसिद्ध आहे. येथे बकऱयांचा बाजार भरतो. तसेच कडधान्य व सर्व भाजीपाला मिळत असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. तसेच पंतनगर येथे दर गुरुवारी भरणाऱया आठवडी बाजारामुळे होन्निहाळ, माविनकट्टी, पंतनगर व पंतबाळेकुंद्री नागरिकांची चांगली सोय होऊ लागली आहे.
या भागातील आठवडी बाजारामुळे शेतकऱयांनाही आपला माल विकण्यासाठी थेट व्यासपीठ मिळत आहे. त्यामुळे शेतकरीही स्वावलंबी होत आहेत.









