प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत नव्याने लॉकडाऊन करताना सर्वपक्षीय आमदार, प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. या लॉकडाऊनमुळे रत्नागिरीत पूर्वपदावर येवू घातलेल्या व्यापार उद्योगांची घडी विस्कळीत झाल्याचा आक्षेप रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी घेतला आहे. मात्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या एकाधिकारशाहीमुळे आज लॉकडाऊन झाला असल्याचा टोला कीर यांनी लगावला आहे.
जिल्हय़ात 1 ते 8 जुलै रोजी जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे जिल्हय़ात प्रचंड नाराजी असल्याचे कीर यांनी सांगितले. कोरोना संकटात मुंबई व इतर प्रदेशातून येणाऱया लोकांबाबत सर्वपक्षीय बैठक होऊन चर्चा करणे आवश्यक होते. तसेच नव्याने लॉकडाऊन करताना येथील सर्वपक्षीय आमदार, प्रमुख पदाधिकारी यांच्याशीही चर्चा करणे आवश्यक असताना तशी कोणतीही गोष्ट झालेली नाही. लॉकडाऊन होणार म्हणून जिल्हय़ात खरेदी करण्यासाठी लोकांनी बाजारपेठा, डीमार्ट आदी ठिकाणी प्रचंड गर्दी आदल्या दिवशीपर्यंत केली होती. त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र निर्माण झाले. यातून निर्माण होणाऱया नव्या संकटाची जबाबदारी कोण घेणार, असेही प्रश्न आता निर्माण होणार असल्याचे कीर यांनी सांगितले. या एकाधिकारशाहीमुळे पूर्वीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची मुदतपूर्व बदली आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नियुक्ती हे त्याचेच फलित असल्याचा आक्षेप कीर यांनी घेतला आहे. मिश्रा हे सर्वसामान्य जनतेला भेट देत नसल्याचीही सर्वत्र चर्चा होत असल्याचे कीर यांनी सांगितले.









