प्रतिनिधी/ सातारा
मागील वर्षीच्या पुरपरिस्थितीत सातारा तसेच सांगली जिह्यात मोठे नुकसान झाले होते, जीवित हानीही झाली होती. या वर्षी मात्र कोणत्या धरणातून किती विसर्ग केला जाणार आहे, याची पूर्व कल्पना विविध माध्यमातून पुराचा प्रादुर्भाव होणाऱया सातारासह, सांगली जिह्यातील यंत्रणा, लोक प्रतिनिधी तसेच गाव पातळीपर्यंत देण्यासाठी उत्तम समन्वय असलेली सक्षम यंत्रणा उभी करावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कोरोना व धरणातील पाणीसाठा, पूर परिस्थिती नियोजनाबाबत बैठक पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ अधीक्षक अभियंता श्री मिसाळ लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सुरेन हिरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.
पुर रेषेच्या आत ज्यांची घरे आहेत, त्यांना पुन्हा नोटीसा द्या, संभाव्य धोक्याची माहिती देवून त्यांचे स्थलांतर करावे, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, सर्व धरणासाठी पूर नियंत्रण अधिकारी नियुक्त केले असून या सर्वांबरोबर उत्तम समन्वय ठेवून काम करा, जेणे करून वेळच्या वेळी पाण्याचा विसर्ग होईल आणि लोकांना कोणताही त्रास होणार नाही. यासाठी 24 तास दक्ष राहा अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.








