प्रतिनिधी / कोल्हापूर
सातत्याने येणाऱया महापुरामुळे आता पूररेषा आणि नगररचना नियमांचे पुनर्विलोकन आवश्यक बनले आहे. निसर्गाने सर्वोत्तम पुररेषा दिली आहे, त्यावर निर्णय झाला पाहिजे. यासंदर्भात लवकरच अभ्यास गट स्थापन केला जाईल. आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनने यात सहभाग द्यावा. अभ्यास गटाने 3 महिन्यांत अहवाल सादर केल्यास विकासाची दिशा ठरवणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
कोल्हापूर आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनने सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनी सोमवारी रेसिडेन्सी क्लबमध्ये लोगो अनावरण व मान्यवरांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, उपाध्यक्ष विजय चोपदार यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आर्किटेक्ट प्रमोद बेरी, विलास भोसले, जी. आर. दिघे, पी. पी. खरे, बलराम महाजन, जयसिंगराव मोरे, एच. डी. सरनाईक, मोहन वायचळ, रमेश पोवार, एस. एल. कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते स्व. आर. एस. बेरी यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले.
मंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हÎात कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा एकमेकांना जेथे मिळतात, तेथे प्रवाहाला अडथळा येतो, अन् फुग वाढत जाते. त्यामुळे महापूर काळात पाणी किती आले, अन् किती सोडले, इतकेच काम जलसंपदा विभागाकडे रहाते. त्यामुळे नदीपात्राबाहेर आलेले पाणी सोडण्याचे नियोजन हवे आहे. पात्रात किती पाणी आले, ते किती बाहेर पडले, याचे नियोजन झाल्यास 40 टक्के पाणी वळवू शकतो. हे पाणी जमिनीखालील बोगद्यांद्वारे राजापूरच्या पुढे सोडणे शक्य आहे. यावर अभ्यास गटाने अभ्यास करून तीन महिन्यात अहवाल द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले, यंदाच्या महापुरापुर्वी अलमट्टीतून सोडण्यात येणाऱया पाण्याचे नियोजन झाले, पुरापुर्वी ताकारी, टेंभू, म्हैसाळ प्रकल्प सुरू ठेवले, त्यामुळे पुराचे मंदगतीने ओसरणारे पाणी कमी झाले. सध्या पेव्हींग ब्लॉकमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येत आहे. बऱयाच ठिकाणी हा परिणाम दिसून आला आहे. निसर्गानेच आता सर्वोत्तम पुररेषा निश्चित केली आहे. त्यावर निर्णय झाला पाहिजे. पुररेषा आणि नगररचनाच्या नियमांचे पुनर्विलोकन गरजेचे आहे. नगर पालिका असलेल्या मोठÎा गावांकडे गावांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण आणि नागरी भागासाठी समान असे टाऊन प्लॅनिंगचे नियम भविष्यात गरजेचे आहेत. जिल्हÎात मोठी धरणे नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अभ्यासगटाने यावर उपाय सुचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष विजय चोपदार यांनी प्रास्ताविक केले. राज डोंगळे यांनी आभार मानले. यावेळी सुधीर राऊत, उमेश कुंभार, अनील घाटगे, गौरी चोरगे, प्रशांत काटे, जयंत बेगमपुरे, अंजली जाधव, प्रमोद पोवार, विजय पाटील, प्रशांत पत्की यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
जनआशिर्वाद यात्रा नव्हे जन शिव्याशाप
मंत्री जयंत पाटील म्हणाले, भाजपचे केंद्रीय मंत्री राणे यांची राज्यात जनआशिर्वाद यात्रा सुरू आहे. पण वाढलेली महागाई, गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ पाहता ही जन आशिर्वाद यात्रा नव्हे जन शिव्याशाप यात्रा आहे. त्यांच्या या यात्रेबद्दल जनतेत नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.