आरोग्य-वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांची जिल्हा प्रशासनांना सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील पूरग्रस्त भागात संसर्गजन्य रोगांचा फैलाव होवू नये यासाठी आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर हाती घेण्याची सूचना आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी जिल्हा प्रशासनांना सूचना दिली आहे. पूरपरिस्थिती असलेल्या खेडय़ांमध्ये, नागरिकांचे स्थलांतर केलेल्या निवारा केंद्रांमध्ये उद्भवणाऱया समस्यांबाबत डॉ. सुधाकर यांनी सोमवारी बेळगाव, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा यादगिर आणि कोप्पळ जिल्हा प्रशासनाशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
पुरामुळे गुलबर्गा जिल्हय़ात सर्वाधिक हानी झाली आहे. या जिल्हय़ातील 155 खेडी पाण्याखाली आहेत. 55 खेडय़ांचे स्थलांतर केले आहे. जिल्हय़ातील 23 हजार 250 जणांना निवारा केंद्रांमध्ये हलविण्यात आले आहे. विजापूर जिल्हय़ात 27 खेडय़ांना पुराचा फटका बसला आहे. या जिल्हय़ातील 1861 जणांचे निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.
पूरग्रस्तांना राहण्याची व्यवस्था केलेल्या निवारा केंद्रांमध्ये सकस आहार पुरविण्यासाठी यादी ठरविण्यात आली आहे. तेथील परिसर स्वच्छ ठेवावा, दररोज परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, तेथील सर्वांची नियमित आरोग्य तपासणी करावी. पूरग्रस्तांना कोरोना व इतर संसर्गजन्य रोगांसंबंधी तज्ञांमार्फत जाणीव निर्माण करावी, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनांना दिल्या.
ज्येष्ठ नागरीक, बाळंतीण, गर्भवती आणि लहान मुलांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, समुदाय आरोग्य केंद्रांमध्ये किंवा तालुका इस्पितळांमध्ये उपचार आणि आरोग्यविषयक सुविधा पुरवाव्यात. ताप व कोरोनाची लक्षणे असणाऱयांचे विलगीकरण करून चाचणी करावी. निवारा केंद्रांमधील सर्वांना मास्क, सॅनिटायझार पुरवावेत. शिवाय समाजिक अंतराचे सक्तीने पालन केले जावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
संसर्गजन्य रोग नियंत्रणात
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यू, चिकनगुनिया व इतर संसर्गजन्य रोग नियंत्रणात आहेत. या महिन्यात अनेक सण असून ते मोठय़ा प्रमाणात साजरे होतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणांच्या कालावधीत जिल्हा प्रशासनांनी अधिक दक्ष रहावे. पुढील तीन महिने हिवाळय़ाचे असून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे यापुढेही कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत अधिक कार्यक्षम व्हावे, असे ते म्हणाले.









