मुख्यमंत्री येडियुराप्पांची माहिती : 51 हजार शेतकऱयांच्या खात्यात 36.57 कोटी रु. इनपुट सबसिडी जमा
प्रतिनिधी / बेंगळूर
पुरामुळे पिकहानी झालेल्या राज्यातील 51,810 शेतकऱयांच्या बँक खात्यामध्ये 36 कोटी 57 लाख रुपये इनपुट सबसिडी (गुंतवणूक अनुदान) जमा करण्यात आले आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी ऑनलाईनद्वारे शेतकऱयांच्या खात्यामध्ये सबसिडी जमा केली. याच दरम्यान, त्यांनी पूर आणि अतिवृष्टीबाधित जिल्हय़ांसाठी 85 कोटी 49 लाख रुपये मदत देण्यात आली असून जिल्हा प्रशासनांनी त्वरित मदतकार्य हाती घ्यावे, अशी सूचना दिली.
पुरामुळे नुकसान झालेल्या 12 जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत सीईओंशी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्वरित कार्यवाही करावी. पुरामध्ये अडकलेल्यांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री पुरविण्यात आली आहे. शिवाय राज्यातील पूरग्रस्त जिल्हय़ांसाठी 85.49 कोटी रुपये मदत देण्यात आली असून मदतकार्य हाती घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱयांना दिली.
अंदाजापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे हानीसंदर्भात वास्तविकस्थितीचा अहवाल सादर करा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 10 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत मुसळधार पाऊस झाला आहे. बेळगाव, बागलकोट, विजापूर, रायचूर, गुलबर्गा, बिदर, यादगिर, बळ्ळारी, कोप्पळ, मंगळूर, शिमोगा, उडुपी, दावणगेरे जिल्हय़ांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. भीमा नदी आणि तिच्या उपनद्यांना पूर आल्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पुराचा धोका असलेल्या नदीकाठावरील जनतेचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करा, त्यांना चांगला आहार व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवारा केंद्रांमध्ये कोविड मार्गसूचीचे देखील पालन करा, जनावरांचे देखील रक्षण करून चारा पुरवठय़ाची व्यवस्था करा, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिल्या.
शिवाय पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रांमध्ये सामाजिक अंतराबरोबरच मास्क वितरण, डॉक्टरांकडून नियमित आरोग्य तपासणी केली जावी. कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱयांना तातडीने इस्पितळात दाखल करून उपचार करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.









