मुंबई \ ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट राज्यातील तब्ब्ल १६ हजार पूरग्रस्त कुटुंबाना मदत करणार आहे. तसंच, पूरग्रस्त भागांत २५० डॉक्टरांचं पथक पाठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी आज राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे लोकांचं झालेलं नुकसान या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
सहा ते सात जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि महापुराने काय परिस्थिती निर्माण झाली हे सांगायची आवश्यकता नाही. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि अमरावतीचा थोडा भाग या ठिकाणी घरांचं नुकसान आणि अन्य प्रकराचं नुकसान झालं आहे. राज्यांच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं. सात जिल्हे सोडून अन्य जिल्ह्यांमध्ये देखील नुकसान झालं आहे. विशेषत: शेतीचं झालं आहे. राज्यात सात आठ जिल्यात पूरस्थिती आहे. कोकणात घरांचं नुकसान झालं आहे. इतर ठिकाणी शेतीचं नुकसान झालंय. माती वाहून गेली आहे. सहा जिल्ह्यांमध्ये अधिक नुकसान झालं आहे. राज्य सरकार त्यांच्या कार्यक्रमानुसार मदत करेल. काही तातडीची मदत राज्य सरकारकडून मिळणार आहे. आढाव्यानंतर राज्य सरकार आणखी मदत जाहीर करेल अशी खात्री आहे, असं शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्राला अशा संकटांचा अनुभव आहे. माळीणमधील दुर्घटनेनंतर सरकार आणि स्थानिक नेते यांनी पुनर्वसन केलं होतं. पुनर्वसन कसं करतात याचा अनुभव घेतला, असं शरद पवारांनी सांगितलं. तसंच १६ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. १६ हजार कुटुंबांची माहिती मिळाली आहे. चिपळूण, खेडमधील पाच हजार; रायगड महाडमधील पाच हजार, कोल्हापुरातील दोन हजार, सातारामधील एक हजार आणि सांगलीतील दोन हजार लोकांना फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना भांडी, कपडे, अंथरुण अशा जीवनाश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार आहे. याशिवाय वैद्यकीय पथकं पाठवणार आहोत. येत्या दोन ते तीन दिवसांत ही मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती शरद पवारांनी दिली.
शरद पवार यांनी यावेळी नेत्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करु नये असं आवाहन केलं. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तिथे गेलंच पाहिजे. नेमकी वस्तूस्थिती काय आहे याचा आढावा त्यांनी घेतलाच पाहिजे. पण इतरांनी जाऊ नये. मी गेलो तर यंत्रणेतील लोक माझ्याभोवती जमा होतील. यामुळे ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यावरुन लक्ष विचलित होईल, असं शरद पवार म्हणाले.








