प्रतिनिधी/ चिकोडी
कृष्णा नदीला आलेल्या महापुरातील पूरग्रस्तांच्या नुकसान झालेल्या बाबतीत पडलेल्या घरांच्या सर्वेक्षणात व पात्र लाभार्थींना सरकारी मदतनिधी देण्यात भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करीत तालुका पंचायत सामान्य सभेत तालुका पंचायत सदस्यांनी सभात्याग करून धरणे आंदोलन केल्याची घटना गुरुवारी तालुका पंचायतीत घडली.
तहसीलदार कार्यालयातील ग्रेड 2 तहसीलदार दिलावरखान जमादार व उपतहसीलदार सी. ए. पाटील यांना सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले. पूरग्रस्त नागरिकांनी घरे गमावून सहा महिने लोटले तरी अद्याप योग्य पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आलेले नाही. अनेक नुकसानग्रस्तांना सरकारी नियमानुसार भरपाई देणे गरजेचे असताना ते देण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मागील सभेत पूरग्रस्त गावातील सर्वेक्षण पारदर्शी करून पात्र लाभार्थींना सरकारी मदत देण्याचा ठराव करण्यात आला होता. पण अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यास अधिकारी तयार नसल्याचा आरोप करण्यात आला.
ता. पं. अध्यक्षा उर्मिला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस उपाध्यक्षा महादेवी नाईक, सदस्य समीर चाऊस, विरेंद्रसिंह माने, कार्यकारी अधिकारी के. एस. पाटील, शिवानंद शिरगावे, जी. एम. स्वामी, तालुका वैद्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे, महिला व बालविकास खात्याच्या अधिकारी दीपा काळे, सावित्री घुगरे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी बी. बी. बेडकिहाळे यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









