प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरातील अनेक पूरग्रस्त मदतीपासून वंचित असून राज्य शासनाने पूरग्रस्तांना तातडीने मदत करावी. या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने बुधवारी सांगलीत गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. 2021 चा महापूर येऊन दीड ते दोन महिने होत आले आहेत. काही तुरळक पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळाले आहे.
बहुतांश पूरग्रस्तांना अजूनही सानुग्रह अनुदान व रेशनिंग वरील धान्य, पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मदत,शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. तसेच काही पूरग्रस्तांचें पंचनामे झालेले नाहीत. या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सांगलीच्या गणरायाला साकडे घातले व घंटानाद व टाळ वाजून आंदोलन करण्यात आले.
महापूरानंतर मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री मंडळ पाहणी करून गेले. त्यांनी नेमकं काय पाहणी केली व काय व कोणत्या पद्धतीने मदत जाहीर केली आहे. त्याचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही. येत्या अनंत चतुर्थी पर्यंत तात्काळ मदत दिली गेली पाहिजे. अशी मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आम. नितीन शिंदे, पै पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, विकास मगदूम,उमेश देशमुख,चंद्रकांत सूर्यवंशी, इम्रान शेख,वसीम शिकलगार, संजय चव्हाण,अभिमन्यु भोसले,तुळशीराम गळवे, अविनाश गाडेकर, रेखाताई पाटील,प्रहल्लाद व्हनमाणे, म्हाळआप्पा पटाफ, नामदेव हिप्परकर, कल्लाप्पा कारंडे, लक्षुमन पवठे अन्य पूरग्रस्त नागरिक मोट्या प्रमाणात उपस्थित होते.