युवा विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पोलंडमधील कील्से येथे सुरू झालेल्या युवा विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये चमकदार सुरुवात केली असून पूनम व विनका यांनी पहिली लढत जिंकत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
महिलांच्या 57 किलो वजन गटात पूनमने कोलंबियाच्या व्हॅलेरी मेन्डोझाचा 5-0 असा तर विनकाने 60 किलो वजन गटाच्या लढतीत रशियाच्या दारिया पॅन्टेलीव्हाचा 3-2 असा पराभव केला. पूनमची पुढील लढत हंगेरीच्या बीटा व्हर्गाशी होणार आहे तर विनकाची लढत कझाकच्या झुल्डीझ शायखमेटोव्हाशी होणार आहे. भारताने या स्पर्धेत 20 सदस्यांचे पथक पाठविले असून त्यात 10 पुरुष व 10 महिलांचा समावेश आहे. महिला संघात 2019 मधील आशियाई युवा चॅम्पियन नावरेम बेबीरोजिसाना चानू (51 किलो), सनामाचा चानू (75 किलो), अल्फीया पठाण (81 किलोवरील), तीनवेळा खेलो इंडिया सुवर्णविजेती अरुंधती चौधरी (69 किलो) यांच्यासह गितिका (48 किलो), अर्शी खानम (54 किलो), निशा (64 किलो), खुशी (81 किलो) यांचाही समावेश आहे.
पुरुष संघात आशियाई युवा चॅम्पियनशिपचा रौप्यविजेता अंकित नरवाल (64 किलो), आशियाई ज्युनियर चॅम्पियन चाँगथम बिश्वामित्र (49 किलो) हे भारताचे प्रमुख आव्हानवीर आहेत. याशिवाय विकास (52 किलो), सचिन (56 किलो), आकाश गोरखा (60 किलो), सुमित (69 किलो), मनीष (75 किलो), विनित (81 किलो), विशाल गुप्ता (91 किलो), जुगनू (91 किलोवरील) या मुष्टियोद्धय़ांचा समावेश आहे.









