गुणी श्वानाचा अंत : 178 गुन्ह्यांत तपासासाठी मदत, पोलीस अधिकारीही झाले भावूक, संपूर्ण पथकावर शोककळा

बेळगाव : संरक्षण दल असो किंवा पोलीस दल त्यांच्या मदतीला श्वान दल सदैव तत्पर असते. बेळगाव जिल्हा पोलीस दलातील पूजा या आठ वर्षीय श्वानाचा शनिवारी मृत्यू झाला. पूजाला पोलिसांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. आता पूजाने आपल्या हयातीत केलेल्या कामगिरीला उजाळा दिला जात आहे. पूजाच्या अकाली निधनाने जिल्हा पोलीस श्वान दलात सुतकी वातावरण पसरले आहे. अधिकारी व श्वानांचे प्रशिक्षक सध्या दु:खात आहेत. या घटनेनंतर ‘तरुण भारत’ने पूजाची कामगिरी व कारकिर्दीविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता प्रत्येकाच्या भावना अनावर झालेल्या दिसल्या. पूजा अद्याप निवृत्त झाली नव्हती. पोलीस दलात किमान दोन ते चार वर्षे तिची सेवा शिल्लक असतानाच तिचा मृत्यू झाला. पोलीस परेड मैदानाजवळ जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, आरपीआय सदाशिव वणजेकर, एम. बी. कसबन्नावर, एम. एल. यमगार व पूजाचे पालक डी. बी. बी. गौडर आदींच्या उपस्थितीत सरकारी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. पोलीस श्वान दलाची दुनियाच वेगळी असते. दोन ते तीन महिन्यांची असताना प्रशिक्षणासाठी श्वानाची निवड केली जाते. पूजाचा जन्म 11 जून 2015 चा. जर्मन शेफर्ड जातीची पूजा गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावण्यात तरबेज होती. बेंगळूर येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिल्यानंतर पोलीस दलात श्वानांची भरती होते. तब्बल आठ वर्षांपासून पूजाने पोलीस दलात सेवा केली आहे.
य् ाा काळात एकूण 178 गुन्हेगारी प्रकरणांचा तपास करण्यात पूजाची मदत झाली. यापैकी 17 चोऱ्या, दरोडे आदी प्रकरणांचा थेट छडाच तिने लावला आहे, असे पूजाचे प्रशिक्षक सांगतात. या कामगिरीबद्दल दोन वेळा विभागीय पातळीवर तिने पहिला क्रमांक मिळविला होता. माणसांप्रमाणेच श्वान पथकातील श्वानांनाही निवृत्तीचे वय ठरलेले असते. हुंगण्याची क्षमता कमी झाली तर डॉक्टरांच्या सल्ल्याने 10 ते 12 वर्षांनंतर श्वानाला निवृत्त केले जाते. श्वान दलातच त्याची व्यवस्था लावली जाते. सेवेत असताना या श्वानावर जितका खर्च केला जातो, त्याच्या निम्मी रक्कम निवृत्त श्वानावर खर्च केली जाते. वेगवेगळ्या प्रकरणांचा छडा लावण्यात मदत करणाऱ्या श्वानांना त्याचे प्रशिक्षक काहीच कमी पडू देत नाहीत. वरिष्ठ अधिकारीही अशा श्वानाविषयी अभिमान बाळगून असतात. जिल्हा पोलीस श्वान पथकात गुन्हे तपासासाठी तीन प्रशिक्षित श्वान होते. यापैकी पूजाचा मृत्यू झाल्यामुळे आता दोन श्वान राहिले आहेत. स्फोटकांच्या तपासासाठी दोन आणि अमली पदार्थांच्या तपासासाठी एक असे एकूण पाच श्वान आहेत. जिल्ह्यात कोठेही एखादी गुन्हेगारीची घटना घडली की गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी प्रथम श्वान पथकाला पाचारण केले जाते. अनेक प्रकरणात श्वान पथकाच्या प्रयत्नांमुळे सुगावा लागतो. पोलीस दलासाठी जर्मन शेफर्ड, लॅब्रेडॉर, डॉबरमॅन, बेल्जियम मिलेनॉईस जातींचे श्वान खरेदी केले जातात. लष्करी सेवेत मुधोळ हाऊंड या देशी श्वानांचा वापर होऊ लागला आहे. प्रशिक्षणावेळी असणारे दोन पोलीस या श्वानांच्या निवृत्तीपर्यंत त्याच्यासमवेत असतात. त्यांची प्रत्येक आज्ञा श्वान ऐकत असते. आरटीओ कार्यालयाजवळ जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकाची इमारत आहे. पूजाच्या अकाली जाण्याने संपूर्ण पथकावर शोककळा पसरली आहे. य् ाासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पूजाच्या निधनाने आपल्याला धक्का बसला आहे. आपण सारे मतमोजणीच्या ठिकाणी बंदोबस्तात असताना पूजाच्या निधनाची बातमी आली. पूजा ही अत्यंत गुणी श्वान असल्याने आपल्याला या बातमीने अतीव दु:ख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.









