अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला त्यांची पूजस्थाने सांगत आहेत. ते म्हणाले, गाईच्या कैवाराने मी परशुरामावतारात सहस्रार्जुनाला मारून ठार केले आणि एकवीस वेळा पृथ्वीवरील मुख्य लढवय्ये असे क्षत्रिय मी मारले. गोकुळात अवतार घेऊन गाईची सेवा केली. गाईच्या सेवेनेच मला पुष्टता प्राप्त झाली. म्हणूनच लहानपणी कंस, चाणूर यासारखे मोठमोठे मल्ल मी मारून टाकले. जो आपत्कालात गाईचे संरक्षण करतो, तो मला फार आवडतो. गाईला दररोज गोग्रास द्यावा, गवत घालावे आणि तिच्या अंगावरून हात फिरवून तिचे अंग कुरवाळावे, तेव्हढय़ाने मी प्रसन्न होतो. उद्धवा ! निर्लोभीपणाने गाईची सेवा केली असता माझी प्राप्ती होते. वैष्णव माझे पुढील पूजास्थान आहेत. वैष्णवाची सेवा करणे मोठे कठीण काम आहे. तेथे जात हे प्रमाण नाही. दासीपुत्र विदुर, माकडाच्या जातीत जन्माला आलेला मारुती, वैष्णवांमध्ये अत्यंत श्रे÷ होता. राक्षसांमध्ये विभीषण व दैत्यांमध्ये प्रल्हाद, हे मला अनन्यभावाने शरण आले, म्हणून त्यांना वैष्णवपण प्राप्त झाले. जातीने श्रे÷ असून जर भक्तिरहित असेल तर तो वैष्णव नव्हे हे लक्षात ठेव. जाणतेपणा, शहाणपणा, ज्ञातेपणा आणि जातीचा अभिमान हे सोडून जो मला अनन्यभावाने शरण येईल, तोच खरोखर माझा वैष्णव होय असे समज. त्या वैष्णवाचे पूजन करावे पण ते बाह्य उपचारांनी मात्र नव्हे, तर बंधुस्नेहाने. मन खरे खरे कळवळले पाहिजे. त्याचेच नाव खरे पूजन. सख्ख्या बंधूंचा स्नेह कसा असतो ते ऐक. बंधूला जर रणांगणांत घाव लागला, तर शत्रूकडून होणाऱया घावाचा स्वतः पुढे येऊन निःपात करतो. असा अंतःकरणांतील कळवळा असतो. तोच खरोखर वैष्णवांच्या पूजेचा विधी होय. स्नेहाशिवाय नुसत्या टिळेमाळा असतात, त्यांच्या योगाने भगवंताला आनंद होत नाही. साधु हे एकाच पित्याचे पुत्र असल्यामुळे अकृत्रिम बंधूच आहेत. त्यांमध्ये सावत्रपणासारखा फरक बाळगणे हा काही खरा स्नेह नव्हे. खरे पहावयास गेले तर भक्तांची आणि अभक्तांची उत्पत्ती माझ्यापासूनच आहे. पण माझ्या ठिकाणी भाव ठेवणे व भाव न ठेवणे असा सावत्रपणा उपस्थित झाला, की परस्परात विरुद्ध स्थिती निर्माण होते. वैष्णव हे विष्णूच्याच उदरामध्ये असतात. त्याच उदरामध्ये आपणही जाऊन रहावे म्हणजे सहजच सख्खेपणा येऊन अकृत्रिम कळवळा उत्पन्न होतो. असा बंधुभावाने जो कळवळा उत्पन्न होतो, तीच वैष्णवकुळाची पूजा होय. अशी वैष्णवांची पूजा करणाऱयाजवळ भक्तीला भुललेला असा मी ति÷त उभा रहातो.
वैष्णव माझे पाचवे पूजास्थान होय. आता आकाशाचे पूजन ऐक. कारण, त्यात केवळ माझे ध्यान असते. आकाश हे निर्लेप आणि निर्विकार आहे. तसेच ते अत्यंत सूक्ष्म असून निराकार आहे. त्याचप्रमाणे निरंतर हृदयामध्ये खरोखर माझे ध्यान करावे. स्वस्थपणाने ध्यानस्थ बसून सगळेच्या सगळे महदाकाश जो आपले हृदयाकाश करून सोडतो, त्याने माझी म्हणजे परमेश्वराची पूजा केली म्हणून समजावे. अत्यंत सूक्ष्म व निर्विकार असे माझे ध्यान हृदयामध्ये दृढ असणे तीच माझी खरी पूजा होय. अंत न लागणारा असा मी त्याच्याच योगाने पूजला गेलो असे समजावे. आकाशाला डाग लावावयाला गेले असता आकाशाला कधीच लागत नाही, त्याप्रमाणे साऱया कर्मात वागत असताना आपण मुक्तच आहो असे भक्त पाहतो तसेच आकाश सर्व पदार्थात व्याप्त आहे पण ते तसे व्याप्त असूनही अत्यंत अलिप्तच असते. त्याप्रमाणे तो आकाशावर नि÷ा ठेवून सर्व कर्मात वागत असूनही कर्मातीतच असतो. आता वायूचे अर्चन ऐक. वायूच्या ठिकाणी भगवदबुद्धी असून ती कधी ढळत नाही कारण, वायूच्याच योगाने प्राणिमात्रांना सजीवपणा आलेला आहे आणि खरोखर जगाला धारण करणाराही तोच आहे. वायूच्या रूपाने सर्व प्राणिमात्रांचा प्राण मीच झालो आहे. हे लक्षात ठेव. प्राणाचा मुख्य प्राण तो मी. म्हणूनच वायु हा मत्स्वरूप आहे. वायु हा आकाशामध्येच उत्पन्न होतो आणि उत्पन्न झाला तरी त्यापासून वेगळा होत नाही. तो सर्व प्रकारच्या हालचालींमध्ये आकाशातच असतो, आणि अखेर आकाशामध्येच स्थिर होतो.
क्रमशः







