अध्याय अकरावा
गायत्रीच्या पुजास्थानाबद्दल सांगून झाल्यानंतर भगवंत पुढे म्हणाले, वैष्णव माझे पुढील पूजास्थान आहेत. दासीपुत्र विदुर, माकडाच्या जातीत जन्माला आलेला मारुती, वैष्णवांमध्ये अत्यंत श्रे÷ होता. राक्षसांमध्ये विभीषण व दैत्यांमध्ये प्रल्हाद, हे मला अनन्यभावाने शरण आले, म्हणून त्यांना वैष्णवपण प्राप्त झाले. जाणतेपणा, शहाणपणा, ज्ञातेपणा आणि जातीचा अभिमान हे सोडून जो मला अनन्यभावाने शरण येईल, तोच खरोखर माझा वैष्णव होय. अशी वैष्णवांची पूजा करणाऱयाजवळ भक्तीला भुललेला असा मी ति÷त उभा रहातो.
आता आकाशाचे पूजन ऐक. कारण, त्यात केवळ माझे ध्यान असते. आकाश हे निर्लेप आणि निर्विकार आहे. तसेच ते अत्यंत सूक्ष्म असून निराकार आहे. त्याचप्रमाणे निरंतर हृदयामध्ये खरोखर माझे ध्यान करावे. अत्यंत सूक्ष्म व निर्विकार असे माझे ध्यान हृदयामध्ये दृढ असणे तीच माझी खरोखर पूजा होय. आता वायूचे अर्चन ऐक. वायूच्या ठिकाणी भगवदबुद्धी असून ती कधी ढळत नाही कारण, वायूच्याच योगाने प्राणिमात्रांना सजीवपणा आलेला आहे आणि खरोखर जगाला धारण करणाराही तोच आहे. वायूच्या रूपाने सर्व प्राणिमात्रांचा प्राण मीच झालो आहे. हे लक्षात ठेव. प्राणाचा मुख्य प्राण तो मी. म्हणूनच वायु हा मत्स्वरूप आहे. वायु हा आकाशामध्येच उत्पन्न होतो आणि उत्पन्न झाला तरी त्यापासून वेगळा होत नाही. तो सर्व प्रकारच्या हालचालींमध्ये आकाशातच असतो आणि अखेर आकाशामध्येच स्थिर होतो. त्याप्रमाणेच जन्मकर्माचा निर्णय समजूनही आपले अधि÷ान न सोडणे व प्राणाचाही प्राण होऊन राहणे हेच वायूचे पूजन होय. प्राणाचे जाणेयेणे चालू असले, तरी ‘ब्रह्मरूप ते मीच’ हेच नित्य ध्यान करणे व ते करताना निरंतर जागृती राखणे, हेच वायूचे पूजन होय. माझे पुढील पुजास्थान जल म्हणजे पाणी होय. जलानेच जलाची पूजा करावी, म्हणजे जलाच्या योगेकरूनच ईश्वराविषयी आवड उत्पन्न होते आणि ती पूजा भगवंताला पोचते. असा भक्त माझा फार आवडता असतो. उद्धवा! ‘आपो नारायणः साक्षात्’ ह्या मंत्राचा जो अर्थ आहे, त्यावरून देवानेच देव पूजिला जातो असे निश्चित समज. उद्धवा ! दुधाने क्षीरसागराची पूजा करावी, त्याप्रमाणे द्रव्यानेच द्रव्याची पूजा करणे असा हा खरोखर जलाने जलाची पूजा करण्याचा प्रकार आहे. जीवाला जीवनच वाचविते. त्या जीवनाचेही जीवन ते मी. म्हणून लाटांनी समुद्राचे पूजन करावे, त्याप्रमाणे जीवनानेच जीवनाची पूजा करावी. आता पृथ्वीचे पूजन ऐक. पाण्यामध्ये पृथ्वी ही निराधार असते, म्हणून ती विरून जाऊन तिचे पाणी होऊ पाहते आणि ह्यामुळेच तिला धारण करणारा (धराधर) मी तिच्यामध्ये शिरून राहतो म्हणून ती मूळची निराधार असूनही साधार झाली. म्हणून पृथ्वी हे माझे पूजास्थान आहे. तिच्या पूजेचे विधान आता ऐक. गाईसारखे स्थंडिल करून त्यावर माझे आवाहन करावे. गाईसारख्याच स्थंडिलाच्या आकारावर हे पूजन का ? असे म्हणशील, तर पृथ्वी ही गाईसारखी आहे. ह्याकरिता तिची पूजा करावयाचा प्रसंग येईल, तेव्हा तिच्याच आकाराचे स्थंडिल करावे. त्या स्थंडिलावर पृथ्वीची पूजा करण्यासाठी धराधराचे आवाहन करावे. नंतर तिच्या लिंगाची व हृदयमंत्राची मंत्रोक्त पूजा करावी. हृदय, कवच, शिखा, नेत्र, शक्ति, बीज अशा लक्षणांनी युक्त असे यंत्र स्थंडिलावर काढून धराधराची महापूजा करावी.
ह्याप्रमाणे पृथ्वीचे सर्व पूजन सांगितले. आता आपली आपण पूजा करणे हे दहावें पूजास्थान आहे. त्याचेही लक्षण ऐक.
आधी एक आणि पुढे पूर्ण म्हणजे पूज्य, त्याचे नांव दहावे लक्षण, आपले पूजास्थान आपण असणे हे पूजेचे आश्चर्यकारक साधन आहे. पूज्यापुढे आणखी कोटय़वधी पूज्ये दिली, तरी गणिताचे काही कारणच नाही. पण पहिल्या पूज्याला जर का एक खाली फांटा फुटला, तर मात्र गणित करता करता मनुष्य बेजार होऊन जाईल. पूज्याला फाटा फुटला म्हणजे त्याला एक म्हणतात. एकपणाने पूर्ण असणे म्हणजे तो सहजच परिपूर्ण असतो.
क्रमशः







