शनिवारी पुलंची पुण्यतिथी होती. मोबाईलवरचे सगळे समूह पुलंच्या खऱया खोटय़ा आठवणींनी दुथडी भरून वाहत होते. कोणी आपल्या पत्राला आलेलं पुलंचं औपचारिक किंवा दिलखुलास उत्तर सादर केलं होतं. कुणी फोटो. कुणी आठवणी. खऱया की खोटय़ा-कोणी ठरवायचं आणि कशाला.
दोन दशकांपूर्वी आपल्यातून गेलेला, नात्यागोत्यातला नसलेला एक माणूस आपल्याला जवळचा वाटतो हे वाचकांना सांगावंसं वाटतं, त्याच्याशी असलेली सलगी, त्याच्याशी केलेला पत्रव्यवहार, बरोबर काढलेले फोटो मिरवताना अभिमान वाटतो… यात त्या माणसाचं कलाकार असण्याइतकंच माणूस म्हणून मोठेपण आहे. हे मोठेपण अबाधित राहो.
पु. ल. आज हयात असते तर काय झालं असतं. मराठी वाहिन्यांवर बोलली जाणारी अद्भूत व्याकरणरहित मराठी ऐकून त्यांनी कदाचित दूरदर्शनवरच्या ‘नवमराठीचा जाळीव इतिहास’ लिहिला असता. सतत साडय़ा नेसून अहोरात्र टीव्हीच्या पडद्यावर नाचणाऱया पुरुषांचे (सारे प्रवासी साडीचे!) साडीहरण केले असते.
एका गोष्टीची मात्र कल्पना करवत नाही. आजच्या राजकारणावर, आसपासच्या सावळय़ा गोंधळावर त्यांनी कदाचित फर्मास लेखन केले असते. ‘खिल्ली’ पुस्तकाच्या नव्या आवृत्तीची पाने वाढली असती. पण चाहत्यांना पु. ल. कितीही आवडत असते तरी त्यांचे राजकारण्यांवरचे विनोद आजच्या समाज माध्यमांमधील मंद बुद्धीच्या जल्पकांना पचनी पडले नसते. त्यांनी पुलंचा झुंडीने येऊन पुलंचा छळ केला असता. आपण नुसते बघत राहिलो असतो. मनातल्या मनात ओशाळगत झालो असतो, चरफडलो असतो.
टीव्हीवरच्या पाककृतीविषयक कार्यक्रमांमध्ये एक चकचकीत स्वयंपाकघर असतं. ते इतकं व्यवस्थित आवरलेलं असतं की खरं वाटत नाही. पण त्या स्वयंपाकघरात ‘आपली सरोज खरे’ वाटणारी एक भगिनी कुठला तरी पदार्थ बनवत असते. मधूनमधून सूत्रसंचालकाला रेसिपी सांगत असते. पदार्थ बनवल्यावर सूत्रसंचालक एक घास खातो. घासाबरोबर आवंढा गिळून ‘वाव!’ असा उद्गार काढतो. ‘वाव!’ या इंग्रजी उद्गारावर मी नापसंती व्यक्त केली तेव्हा मित्राने मला पुलंचंच एक अवतरण सुनावलं होतं. गवयाने चांगला सूर लावल्यावर श्रोता उत्स्फूर्तपणे म्हणतो, “क्मया बात है!’’ – “हे फार श्रवणीय झाले!’’ असं कोणी म्हणत नाही. त्याच चालीवर पदार्थाची चांगली चव लागल्यावर सूत्रसंचालक उत्स्फूर्तपणे ‘वॉव’ म्हणतो, “हे फार भक्षणीय झाले!’’ असं म्हणत नाही.








