सव्वा लाखाच्या रोख रकमेसह 13 तोळे सोने लंपास
वार्ताहर/ पुसेसावळी
पुसेसावळी (ता. खटाव) येथे एका घरावर पाच दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने मारहाण करून घरातील एक लाख तीस हजार रुपये रोख व सुमारे 13 तोळे सोन्याचा ऐवज पळविल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत जयश्री माने व संजय कदम जखमी झाले आहेत. या घटनेने पुसेसावळी परिसरात एकच खळबळ उडाली असून पुसेसावळी पोलिसांत अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुसेसावळी जुन्या एसटी स्टॅण्ड नजीक भाग्यलक्ष्मी स्टील सेंटर हे हणमंतराव माने यांचे भांडय़ाचे दुकान असुन ते आपली पत्नी जयश्री माने व मावस जावई संजय कदम यांच्यासमवेत चालवतात व दुकानपासुन नजीकच पाठीमागे बंगल्यात राहतात.
मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून झोपले असता बुधवारी मध्यरात्री 1.30 सुमारास पाच दरोडेखोरांनी घरात प्रवेश करुन जयश्री माने यांना लोखंडी रॉड व दांडक्याने जबर मारहाण करुन तसेच संजय कदम यास दांडक्याने उजवा हात व पायावर मारहाण करुन अंगावरील सोन्याच्या वस्तू काढुन द्या म्हणून दम देऊन दरोडेखोरांनी कपाटातील एक लाख तीस हजार रुपये रोख, सोन्याची अंगठी, चेन, मंगळसुत्र, कानातील रिंगा, कर्णफुले, बांगडय़ा, बोरमाळ असा सुमारे पाच लाख वीस हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
दरोडखोरांनी केलेल्या मारहाणीमध्ये जयश्री माने व संजय कदम हे दोघे जखमी झाले असुन जयश्री माने यांना उपचारासाठी कृष्णा हॉस्पीटल कराड याठिकाणी दाखल केले आहे. या घटनेने पुसेसावळी परिसरात एकच दहशत निर्माण झाली असून दरोडेखोरांचा तपास लावण्यासाठी ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अजित बोऱहाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. गरजे, व आदींनी भेट देऊन पाहणी करुन तपासासंदर्भात सूचना केल्या. घटनेचा तपास सपोनि प्रशांत बधे करत आहेत.








