एका दिवसात 39.65 किमीचा रस्ता तयार
सातारा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने साताऱ्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा 39.65 किलोमीटर रस्ता एका दिवसात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला आहे. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले आहे.
या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. 39.65 किलोमीटरचा हा रस्ता रविवार, दि. 30 मे 2021 रोजी सकाळी सात वाजल्यापासून आज (दि.31) सकाळी 7 वाजेपर्यंत तयार करण्यात आला. साडेतीन मीटर रुंद आणि 39.65 किलोमीटर लांबीचा हा रस्ता पुसेगाव, जायगाव, औंध, म्हासूर्णे असा होता. जवळपास 474 कामगार आणि 250 वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण झाले. कोविड-19 संदर्भात केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता सदा साळुंके, मुंगळीवार, माजी अभियंता एस. पी. दराडे आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले. यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.









