वार्ताहर / पुसेगाव :
वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुजरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खटाव तालुक्यातील काटेवाडी (बुध) येथील ‘सर्वोदय सामाजिक संस्थे’ने बिनभिंतीची शाळा सुरू केली आहे. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुसेगाव येथे ही शाळा सुरू करण्यात आली आहे. यामुळे वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षणाची संधी मिळाली आहे.
नांदेड, लातूर या भागातील कामगार दिवाळीत कामाच्या निमित्ताने येतात. जून-जुलैपर्यंत त्यांचे वास्तव्य याच वीटभट्टीवर असते. वीटभट्टी मजुरांसाठी कुटुंबाची उपजीविका महत्त्वाची असते. त्यामुळे बहुतांश मुले शाळेत न जाता आपापल्या पालकांसोबत काम करताना आढळून येतात. तर वीटभट्टीच्या जवळपास शाळा, शिक्षण नसल्याने काही मुले हुंदडत असतात. मुलांनी शिकावे, मोठे व्हावे अशी या पालकांची इच्छा असते. पण गांजलेली आर्थिक परिस्थिती पाठ सोडत नसल्याने पालकांचा नाइलाज होतो आणि ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात.
सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन इंगळे यांनी पुसेगावसह परिसरातील अशा मुलांना संघटित केले. वीटभट्टी वरील प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी “बिनभिंतीची शाळा” हा उपक्रम सुरू केला. वीटभट्टी आवारात उभारलेल्या या शाळेत पहिल्याच दिवशी सत्तावीस मुलांनी हजेरी लावली. यावेळी सर्व मुलांचा उत्साह व अभ्यासातील गोडी पाहून शिक्षकांसह पालकांनाही आनंद झाला. दरम्यान, प्रत्येक आठवडय़ाच्या सोमवार ते शनिवारी मुलांची शाळा भरवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना दप्तर, पाटी, पेन्सिल, वही आदी शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यास, गाणी, गोष्टी सांगून त्यांना शाळेचा लळा लावला जाणार आहे. शरीर, आरोग्याची निगा याविषयी माहिती दिली जाणार आहे. शिक्षणामुळे काय होऊ शकते याचे महत्त्व सांगितले जाणार आहे. शासकीय मदतीविना हा उपक्रम सुरू आहे, मदतीचे हात मिळाल्यास आणखी प्रभावी शिक्षण देता येईल, असे जीवन इंगळे यांनी स्पष्ट केले.









