वार्ताहर / कास
रानफुलांचा आनंद घेण्यासाठी कासला येणा-या पर्यटकांना आता परिसरातील 12 निसर्ग पर्यटनस्थळांचे गाईडसह दर्शन घेता येणार आहे. कास दर्शन नावाने ही सशुल्क सेवा १ सप्टेंबरपासून सुरु होत आहे.
कास पठार कार्यकारी समितीकडे अगाऊ नोंदणी केल्यास कास दर्शन सेवेचा लाभ मिळणार आहे. समितीचे नूतन अध्यक्ष मारुती चिकणे व उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत यांनी या नवीन उपक्रमाची माहिती दिली. 25 ऑगस्टला पठारावर पर्यटन शुल्क आकारणी सुरु झाली असली तरी खरा फुलांचा रंगोत्सव हा दुर्गोत्सवानंतरच पहायला मिळणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
एक सप्टेंबरला कास पठारासाठी वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंग सुरु होईल. त्या अंतर्गतच ‘कास दर्शन’साठी बुकिंगचा पर्याय उपलब्ध केला आहे. कास पठारावर फिरुन झाल्यानंतर कास परिसराच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी परिसर दर्शन सहलीला पर्याय निवडून ऑनलाईन बुकिंग करावे, असे आवाहन कास कार्यकारी समितीचे नूतन अध्यक्ष मारुती चिकणे यांनी केले.
समितीचे माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव म्हणाले,”कास परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. पर्यटकांना त्याची माहिती व्हावी, यासाठी ‘कास दर्शन’ या चार तासांच्या फेरीचे नियोजन समितीने केले आहे. पार्किंगपासून ही फेरी सुरु होईल. सज्जन गड आणि उरमोडी दर्शन, घाटाई देवराई, कास तलाव, भांबवली धबधबा, अंधारी येथून वासोटा व कोयना जलाशयाचे दर्शन, सह्याद्रीनगरचा पवन उर्जा प्रकल्प, वेण्णा व्ह्यू, एकीव धबधबा, कण्हेर धरण व्ह्यू आणि तेथून परत पार्किंग असा या फेरीचा मार्ग असेल. या फेरीमध्ये दोन चहा व पाण्याची बाटली प्रत्येक पर्यटकाला देण्यात येईल.”
कास पठार जसे जागतिक निसर्ग वारसास्थळ आहे. त्याच्या परिसरात निसर्गाची मुक्त हस्ते उधळण आहे. या परिसराचे माहितीसह दर्शन घडावे, अशी पर्यटकांची मागणी होती. त्याला उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी मुर्त स्वरुप दिले. प्रत्येक गटाबरोबर एक गाईड असेल. त्या त्या स्थळांची माहिती हा गाईड पर्यटकांना देईल, असे समितीचे सदस्य गोविंद बादापूरे (रा. कासाणी) यांनी स्पष्ट केले. शनिवार- रविवार गर्दी करण्यापेक्षा सोमवार ते शुक्रवार पठाराला भेट देऊन पर्यटकांनी कासच्या निसर्गाचा आनंद घ्यावा, असं आवाहनही समिती सदस्य ज्ञानेश्वर आखाडे यांनी केले आहे.








