अन् आपुलकीच्या गौरवाने डोळ्यांत आनंदाश्रू तरळले
प्रतिनिधी / सांगरुळ
कोरोनाच्या महामारीच्या काळात समाजातील काही घटकांकडून मिळणा-या अपमानास्पद वागणूकीच्या पार्श्वभूमीवर अल्प मानधनात घरोघरी जाऊन सेवा बजावणा-या आशा व अंगणवाडी सेविका या कोविड योद्ध्यांचा उमेद फौंऊंडेशनमार्फत सन्मान पत्र देऊन व पुष्प वृष्टी करून गौरव करण्यात आला. या आपुलकीच्या गौरवाने भारावून जाऊन या सेविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
कोरोनाच्या संकटात अल्प मानधनात कोणतेही सुरक्षा कीट नसताना आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका आपले कर्तव्य निष्ठेने बजावत आहेत. घरोघरी जाऊन आजारी लोकांची माहिती घेणे,प्रबोधन करणे,माहितीचे अहवाल पाठवणे,औषधे व सॅनिटायझरचे वाटप करणे यासारखी जोखमीची कामे प्रामाणिकपणे करत आहेत . कर्तव्य बजावत असताना मात्र समाजातील काही घटकांकडून अवहेलना, अपमानास्पद वागणूक, प्रसंगी मारहाणही त्यांच्या वाट्याला येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणे सेवा बजावणा-या या कोविड योद्ध्यांची दखल घेत उमेद फौंऊंडेशनमार्फत ग्रामपंचायत सांगरूळ येथे आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्यावर पुष्पवृष्टी करून व सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला . समाजाकडून मिळणा-या वागणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदने केलेल्या आपुलकीच्या गौरवाने या सेविका भारावून गेल्या. काही सेविकांच्या डोळ्यात तर आनंदाश्रू तरळले.
ग्रामस्थांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी शासनाच्या आदेशानुसार आम्ही प्रामाणिकपणे गावांमध्ये काम करत असतानाकाही नागरिकांच्या कडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे . मारहाणीचे प्रकार घडत आहेत .या पार्श्वभूमीवर चांगल्या कामात बद्दल शाबासकीची थाप पाटीवर देऊन जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारे लोक समाजात असल्याची जाणीव या सत्काराने झाली असल्याची भावना आशा व अंगणवाडी सेविकांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक नवीनचंद्र सणगर यांनी केले. यावेळी उमेदचे अध्यक्ष प्रकाश गाताडे, उपसरपंच सर्जेराव यादव, ग्रामपंचायत सदस्य सचिन नाळे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास डॉ. सागर सासने, यशवंत बॅँकेचे मा. संचालक दिलीप खाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णात खाडे, ग्रामविकास अधिकारी एम पी बीडकर, दक्षता कमिटीचे तानाजी वातकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते. आभार प्रकाश गाताडे यांनी मानले.