उरीमध्ये दोन जवान हुतात्मा
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक शनिवारी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले असून संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.
पुलवामामधील डंगरेपोरा भागात ही चकमक उडाली. हा परिसर सुरक्षा दले आणि स्थानिक पोलिसांच्या विशेष पथकाने वेढला असून शोध अभियान सुरु करण्यात आले आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार डंगेरपुरा भागात दहशतवाद्यांनी आसरा घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण परिसरात सेनादलाचे जवान व स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केल्यावर जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांच्या मृतदेहाजवळ मोठय़ा प्रमाणात शस्त्रs मिळाल्याचेही या अधिकाऱयाने सांगितले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
उरीमध्ये दोन जवान हुतात्मा
दरम्यान, शुक्रवारी रात्री उशीरा आणि शनिवारी पहाटेच्या सुमारास उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. यामध्ये दोन भारतीय जवान हुतात्मा झाले असल्याचे सेनादलाच्या सुत्रांनी सांगितले.पाकिस्तानी सैनिकांनी मॉर्टर गनने डागलेल्या तोफगोळय़ांमध्ये दोन सैनिक जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांची ओळख पटली असुन हवालदार गोकर्णसिंह आणि नायक शंकर एस. पी. अशी त्यांची नावे आहेत. तर यामध्ये चार नागरिकही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.









