हुगळीत 229 वर्षांपासून होतेय प्रथेचे पालन
पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्हय़ातील चंदननगरमध्ये अद्भूत जगधात्री पूजेचे आयोजन झाले. बांगला संस्कृतीतील शतकांपासूच्या देवी वरणच्या परंपरेच्या विपरित रविवारी विसर्जनाच्या दिवशी माता जगधात्रीची पूजा महिलांनी नव्हे तर पुरुषांनी साडी नेसून केली आहे.
13 पुरुषांनी रितसर साडी नेसून डोक्यावर पदर घेत जगधात्री मातेची पूजा केली आहे. हे दृश्य पाहण्यासाठी मंडपात तसेच बाहेर शेकडो भाविकांची गर्दी झाली होती.

इंग्रजांची राजवट असताना 229 वर्षांपूर्वी संध्याकाळ झाल्यावर महिला भीतीपोटी घरातून बाहेर पडत नसत. तेव्हा या पूजेच्या आयोजकांनी स्वतः साडी नेसून जगधात्री मातेच्या पूजेची परंपरा पार पाडली होती आणि ही परंपरा आज देखील कायम असल्याचे पूजा समितीचे संरक्षक श्रीकांत मंडल यांनी सांगितले आहे.
250 वर्षांपूर्वी बंगालचे राजा कृष्णचंद्र दीवाण दाताराम सूर यांच्या मुलीचे घर चंदननगरच्या गौरहाटी येथे होते, तेथे जगधात्री मातेची आराधना व्हायची. पुढील काळात आर्थिक टंचाईमुळे राजाच्या मुलीने ही पूजा तेतुलतला जगधात्री पूजेच्या स्वरुपात भागातील लोकांना हस्तांरित केल्याचे पूजा कमिटीचे संचालक सांगतात. त्यावेळी राजा आणि जमीनदार घराण्यांमध्ये महिलांसाठी पडदा प्रथेचे प्रचलन होते. कुठल्याही सामाजिक कार्यात भाग घेण्याची अनुमती महिलांना मिळत नव्हती. याचबरोबर इंग्रजांच्या राजवटीची भीती महिलांच्या मनात होती. याचमुळे चंदननगरच्या गौरहाटीच्या राजघराण्यात जगधात्री मातेच्या विसर्जनाच्या दिवशी पुरुषांनी साडी नेसून विधी पूर्ण करण्याचा विडा उचलला होता. तेव्हापासून ही प्रथा आजवर सुरू आहे.









