प्रतिनिधी / बेळगाव :
शेतकऱयांना नेहमीच शापित ठरलेल्या बळ्ळारी नाल्याला यावषीही पूर आल्याने वडगाव, शहापूर, अनगोळ, मजगाव, धामणे या परिसरातील शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी यासाठी शेतकऱयांनी अनेक वेळा आंदोलने केली, पाठपुरावा केला. मात्र मुर्दाड बनलेल्या पाटबंधारे खाते आणि जिल्हा प्रशासनाला या शेतकऱयांचे काहीच वाटले नाही. मात्र यावषी अत्यंत चांगले असलेले भात पीक पुरामुळे पाण्याखाली गेल्याने शेतकऱयांचा जीव कासाविस झाला आहे.
बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱयांना शापच ठरला आहे. येळ्ळूर येथून उगम पावलेल्या या नाल्याची खोदाई करणे गरजेचे आहे. मात्र, खोदाई करण्याचे नाटक करून शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. एकेकाळी वरदान ठरलेला हा नाला आता जीवघेणा ठरू लागला आहे.
यावषी मान्सूनचे वेळेत आगमन आणि आतापर्यंत पावसाने दिलेल्या योग्य साथीमुळे भात पिके जोमात होती. त्यामुळे बळीराजा मोठय़ा आशेवर होता. कोरोनामुळे कासाविस झालेल्या बळीराजाला दिलासा मिळाला होता. यावषी तरी आपणाला बऱयापैकी उत्पादन मिळेल, अशा आशेवर शेतकरी वावरत असताना बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे बळ्ळारी नाल्याला पूर आला. त्यामुळे गुडघाभर वाढलेले भात पीक पाण्याखाली गेले. बळ्ळारी नाला परिसरातील जवळपास 200 एकर जमिनीतील भात पीक पाण्याखाली गेले आहे.
सध्या झालेल्या या दमदार पावसामुळे शेतकऱयांच्या आशेवर विरजण पडले आहे. एक तर हलगा-मच्छे बायपाससाठी शेतकऱयांच्या जमिनी हिसकावून घेतल्या आहेत. त्या जमिनीवर माती टाकून देण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. यातच आता मोठय़ा पावसामुळे पाणी साचून सर्वच पीक पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यायचे म्हणून शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. जिल्हा प्रशासनाने आता या बळ्ळारी नाल्याची पाहणी करून शेतकऱयांची काय अवस्था आहे, हे जाणून घ्यावे आणि पाऊस गेल्यानंतर तातडीने बळ्ळारी नाल्याची खोदाई करावी, अशी मागणी शेतकऱयांतून केली जात आहे.









