मुंबई/प्रतिनिधी
गुलाब चक्रीवादळाच्या (Cyclone Gulab) प्रभावामुळे राज्यातल्या विदर्भ-मराठवाडा भागाला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या भागांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे. शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाली आहे. याच नुकसानीचा आढावा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Namdevrao Wadettiwar Maharashtra Cabinet Minister) यांनी घेतला आहे. राज्यात झालेल्या नुकसानीची आणि पंचनाम्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री या भागाची पाहणी करणार असून लवकरच ते त्यांचा दौरा जाहीर करतील असेही वडेट्टीवार म्हणाले.
विदर्भ(vidarbha)-मराठवाड्यात (marathwada) पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी, पुरामुळे ४३६ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ६ जणांचे मृतदेह अद्याप हाती लागले नाहीत. १३६ जण जखमी झालेले आहेत. उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद आणि जळगाव इथं आपत्ती निवारण दल मदतकार्य करत होतं. उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरद्वारे १६ तर बोटीद्वारे २० जणांना वाचवण्यात आलं आहे.
दरम्यान, लातूरमध्ये हेलिकॉप्टरने ३ तर बोटीद्वारे ४७ जणांचे प्राण वाचवण्यात यश आलं. औरंगाबादमध्ये २४ लोकांना बोटीद्वारे वाचवण्यात आलं. या महिन्यात ७१ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर २६ जण जखमी झाल्याची नोंद आहे. लहान मोठे सर्व प्रकारच्या ५७ जनावरांचा मृत्यू वीज पडून झाला आहे. तर १९६ मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. १७ लाख हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असून आत्तापर्यंत ८१ टक्के पंचनामे झाले आहेत. पावसामुळे १९ टक्के पंचनामे बाकी आहेत. अजूनही काही माहिती प्राप्त होत आहे. हे नुकसान गुलाब चक्रीवादळापूर्वीचं आहे. २२ लाख हेक्टर शेती उध्वस्त झाली असल्याचा माझा अंदाज आहे.








