प्रतिनिधी /खोची
वारणा नदीस २०१९ च्या जुलै -ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे खोची ता.हातकणंगले परीसरासह वारणा नदीकाठच्या गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.हे पूरग्रस्त नागरिक शासनाकडून पुनर्वसन होईल या आशेने अजूनही आहे त्यास्थितीत पडक्या घरातच आडोसा करून कोरोना संसर्गजन्य रोगाचा मुकाबला करीत वास्तव्य करीत आहेत.महापूर येऊन आठ महिने होऊन गेले.पुन्हा पावसाळा तोंडावर आला आहे.तरीही प्रशासनाच्यावतीने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही प्रक्रिया झाली नसल्याने पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.पुनर्वसन कधी होणार? या प्रश्नाकडे पूरग्रस्त नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत.
वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे गतवर्षी होत्याचे नव्हते झाले.कोट्यवधी रुपयांची हानी झाल्यामुळे शेतकरी व नदीकाठचे नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. वारणा नदीच्या पाण्याने प्रथमच उच्चांकी पातळी गाठल्यामुळे नदीकाठची अनेक घरे पाण्याखाली गेली होती.पंधरा दिवस ही घरे पाण्याखाली असल्यामुळे या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या गावातील सर्व पुरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करणार असल्याचे सांगितले गेले होते. त्यामुळे पुनर्वसन होणार या आशेने अनेक पूरग्रस्त नागरिकांनी पडक्या घरातच आपला संसार मांडला आहे.पडलेल्या भिंतींना आडोसा करून नागरिक गेली आठ महिने झाले याच घरामध्ये राहत आहेत.
गणेशोत्सव झाला, दसरा झाला, दिवाळी झाली हे तिन्ही मोठे सण, पाडवा,यात्रा,अन्य इतर सण पडक्या घरातच साजरे झाले. तरीही प्रशासनाच्यावतीने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल झाली नसल्याचे पूरग्रस्तातून सांगण्यात येत आहे.तसेच नुकसान भरपाईही पूर्णपणे मिळालेले नाही.आणखी किती दिवस पडक्या घरात राहायचे? हा प्रश्न पूरग्रस्त नागरिकांतून विचारला जात आहे. त्यामुळे पूरग्रस्तांचे पुनर्वसन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. खोची येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गायरानामध्ये मोठ्या प्रमाणात भूखंड शिल्लक आहे.तरीही पूरग्रस्तांना भूखंड देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर जागेची पाहणी करण्याव्यतिरिक्त कोणतीच प्रक्रिया झालेली नाही. महापूर येऊन गेल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने तात्काळ या पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणार असल्याचे सांगितले गेले होते. परंतु आठ महिने झाले. तरीही याबाबत कोणतीच प्रक्रिया झाली नसल्याने पूरग्रस्त नाराज आहेत.
पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ४२८ पूरग्रस्तांचे जबाब फॉर्म भरून घेतले आहेत. हे फॉर्म तहसील कार्यालयात दिले आहेत. तहसीलदार कार्यालयाकडून कागदपत्रांची व इतर कार्यवाही सुरू केली आहे. या जबाब फार्मवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या सह्या आहेत. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर फॉर्म जमा केले आहेत. लवकरच तहसीलदार यांची भेट घेऊन पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पूरग्रस्तांचे पुनर्वसन होईल ,अशी आशा आहे.
सरपंच – वैशाली पाटील
यांनी महापुरामुळे ग्रामस्थांवर मोठे संकट ओढवले आहे .यासाठी गायनामध्ये असणाऱ्या ७२ एकर भूखंडातील पूरग्रस्तांना प्राधान्याने भूखंड द्यावेत व उरलेले भूखंड पूररेषेतील ग्रामस्थांना द्यावेत, अशी आग्रही भूमिका आहे. गावामध्ये जवळपास पंधराशे खातेदार आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे भूखंड दिल्यास ४८ एकरात सर्व ग्रामस्थांना भूखंड वाटपापूर्वी होईल.उरलेल्या भूखंडात सार्वजनिक सुविधा देता येतील. पावसाळ्यापूर्वी भूखंड वाटप तात्काळ व्हावे,यासाठी जिल्हाधिकारी यांची लाँकडाऊन नंतर भेट घेवून मागणी करणार आहे.
उपसरपंच – अमरसिंह पाटील
यांनी खोची येथील पूरग्रस्त पुनर्वसन होईल या आशेने अद्यापही पडक्या घरात आडोसा करून वास्तव्य करीत आहेत. पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार असल्याने नागरिकांनी पडलेल्या घरांची कोणतीही दुरुस्ती न करता आहे. त्याच अवस्थेत घरे ठेवली आहेत.असे मत व्यक्त केले.








