वाळवा / वार्ताहर :
शेतकरी महापुरात नेस्तनाबूत झाला असून कृष्णाकाठच्या शेतीचे अपरिमित नुकसान झालेले आहे. शासनाने नुसती आश्वासने देत शेतकऱ्यांची बोळवन करू नये त्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख आणि फळबाग पिकांसाठी हेक्टरी अडीच लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे, शेतकऱ्याला नवीन शेती करण्यासाठी कर्ज आणि अनुदान मिळावे. गावा गावात महापूर आल्याने घराचे व जीवनावश्यक साहित्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यासाठी पाण्याचा निकष न लावता शंभर टक्के गावांना नुकसान भरपाई मिळावी याविषयी मंत्रालयामध्ये होणाऱ्या बुधवारच्या मिटिंगमध्ये ठोसपणे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा.
शासनाने नुकसानीबाबत ठोस निर्णय जाहीर न केल्यास फेब्रुवारी येत्या शुक्रवारी पलूस तालुक्यातील २६ गावातील शेतकरी पलूस तहसीलदार कार्यालयासमोर घरातील बायका -पोरं जनावरांच्यासह मोर्चा काढतील. शेतकऱ्याला भिक नको हवी आहे, शासनाची नुकसान भरपाई हवी आहे, प्रपंच उभारण्यासाठी मदत हवी आहे असे आवाहन पलुस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व पूरग्रस्त शेतकरी कृती समितीचे नेते मारुती चव्हाण यांनी केले. पलूस तालुक्यातील नागठाणे येथे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी बोलविलेल्या पुरग्रस्तांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.