डॉ. सागर देशपांडे यांचे फोंडय़ात प्रतिपादन : ‘बाबासाहेब पुण्यस्मरण’ कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरेना श्रद्धांजली
प्रतिनिधी /फोंडा
शंभर वर्षाच्या दीर्घायुष्यातील 85 वर्षे केवळ शिवचरित्रावर लिखाण, मनन, वाचन, चिंतन, शिवसृष्टी, नाटक, कादंबरी, शिवचरित्र असा एकच विषय वेगवेगळय़ा पद्धतीने चार पिढींपर्यत पोचविण्याच्या प्रयोजनासाठी झटणारे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे जगातील एकमेव उदाहरण आहे. इतिहासात पुरंदरे हे आडनाव न राहता यापुढे विशेषण म्हणून गणले जाईल. असे प्रतिपादन शिवचरित्राचे गाढे अभ्यासक पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार व संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी केले.
श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ केरी, कृतार्थ म्हार्दोळ आणि मारवा क्रिएटिव्हज ट्रस्ट फोंडातर्फे काल रविवारी राजीव गांधी कला मंदिरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजलीपर ‘बाबासाहेब पुण्यस्मरण’ हा कृतज्ञता व प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या कार्यकाळ सांगण्यासाठी पुरंदरेना त्याच्या दुप्पट म्हणजे शंभर वर्षाचं दिर्घायुष्य लाभवं या दैवयोग आहे. आणि त्या देवतुल्य महापुरूषाचे आत्मचरित्र ‘बेलभंडारा’ लिहिण्याचे भाग्य आपल्या पदरी पडल्याचे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. ज्या माणसानी शिवचरित्रासाठी अपमान, वेदना, सहन करून प्रतिकुल परिस्थितीतही वाट काढली त्याची महती त्यानी विस्तारीत स्वरूपात विद्यार्थ्यासमोर मांडली.
इतिहासात पुरंदरे हे आडनाव न राहता यापुढे विशेषण म्हणून गणले जाईल. बाबासाहेबांना इतिहासाचे बाळकडू बालपणातच आपल्या वडीलाकडून मिळाले होते. फेब्रुवारी महिन्यातील तारखेनुसार व मार्च महिन्यातील तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यापुरती किंवा शालेय जीवनात गुण मिळवण्यासाठी शिवचरित्र शिकू नका. दिलेला वेळ व दिलेला शब्द या वेळेबाबत काटेकोरपणाबद्दल अंमलबजावणी कशी करावी हे शिवचरित्रकार पुरंदरे याच्याकडून शिका असे देशपांडे यानी सागितले.
वेडात मराठे वीर दौडले सात…. कुसुमाग्रज व पुरंदरे संदर्भ
शिवकालीन इतिहासात प्रतापराव गुजरांच्या हौतात्म्यानंतर लिहिलेल्या कवितेत वेडात मराठे वीर दौडले सात… या पार्श्वभूमीवर पुरंदरे यांनी कुसुमाग्रज यांना या घटनेचचे संदर्भासह स्पष्टीकरण कसे दिले हा व त्यानंतर कुसुमाग्रजांनी ‘माझीच कविता आज मला समजली’ अशी पुरंदरे याना दिलेली दाद हा किस्सा देशपांडे यांनी सविस्तरित्या सांगितला. तसा शिवचरित्राचा इतिहास आजच्या पिढीनेही वृद्धिगत करावा. दादर नगर हवेली व गोवा मुक्तीचा संग्रामामध्येही क्रांतीकारी म्हणून बजावलेली भूमिका बाबासाहेबांचे शिवप्रेम व माणसांवरचे प्रेम हे विलक्षण असल्याचे ते म्हणाले.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरानाही भावले पुरंदरे
बाबासाहेबाना 2015 साली देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषणावेळी झालेल्या वादनाटय़ात गोमंतकीय सुपुत्र नामवंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बाबासाहेब हे संशोधकाचे संशोधक असून इतिहासाचा संशोधन कसं करावे यासंदर्भात पुरंदरेंचा जो मानदंड आहे तो इतर संशोधकानी लक्षात घेणे महत्वाचे असून महाराष्ट्र भूषण म्हणून ते लायक व्यक्ती असल्याची प्रतिक्रिया दिल्याची आठवण करून दिली. शिवचरित्र जसं प्रेरणादायी आहे तसाच बाबासाहेब यांचाही ग्रंथही तेवढाच प्रेरणादायी असल्याचे ते म्हणतात. शिवचरित्रांसाठी सायकलने पुस्तकाचे ओझे घेऊन फिरणारा, वेळप्रसंगी बाजारात कोंथंबिरीची चुडी विक्री करून निधी उभारून शिवचरित्रासाठी पैसे कसे गोळा केले, याचाही उलगडा केला.
बाबासाहेब ,महानाटय़ ‘जाणता राजा’ व ‘संभवामी युगे युगे’…
विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अरूण देसाई म्हणाले की बाबासाहेब पुरंदरे यांनी सर्व गोष्टी झेलूनही शेवटच्या क्षणापर्यंत शिवाजी महाराज आणि शिवचरित्राची निष्ठा आणि श्रद्धा डळू न दिलेल्या पुरंदरे यांना संस्थेतर्फे श्रद्धांजली वाहिली. कृतार्थचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी ‘जाणता राजा’ आयोजनाच्या निमित्ताने व त्यानंतर ‘संभवामी युगे युगे’ महानाटय़ावेळी वेलिंग येथे आपल्याला लाभलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहवासाविषयी अनुभव कथक केले. तसेच गोवा मुक्तीसंग्रामामधील योगदान, दादर नगर हवेली येथील पोतुगीजाविरूद्ध बंडात पुरंदरे यांच्या योगदानाविषयी माहिती दिली. ‘जाणता राजा’ व ’संभवामी युगे युगे’ या महानाटय़ात त्यांचे विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाला पाठबळ लाभल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी आजच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची चिकित्सक पद्धती जाणून घेण्यासाठी इतिहासापासून शिकून वर्तमान घडवा असे आवाहन केले. मातृभूमीच्या राष्ट्रीय प्ररणेसाठी असे आदर्श कार्यक्रम झाले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमात विविध 13 विद्यालयातील विद्यार्थ्यानी आवर्जून हजेरी लावली होती. तसेच बाबासाहेब पुरंदरे यांचे चाहते व शिवप्रेमीं मोठया संख्येने उपस्थित होते. मान्यवरांतर्फे बाबसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पाजंली वाहून आदरांजली वाहण्यात आली. स्वागत अरूण देसाई यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुभाष जाण यांनी केले.









