काबूलमध्ये सैन्य रुग्णालयानजीक दोन स्फोट – 19 जण ठार
वृत्तसंस्था / काबूल
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये मंगळवारी सैन्य रुग्णालयानजीक अधिक तीव्रतेचे दोन स्फोट झाले आहेत. या स्फोटांमध्ये 19 जणांना जीव गमवावा लागला असून 43 जण जखमी झाले आहेत. काबूलमध्ये सरदार मोहम्मद दाऊद खान सैन्य रुग्णालयानजीक गोळीबारही झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.
काबूलच्या 10 व्या जिल्हय़ात 400 बेड्स असलेल्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोन स्फोट झाले. घटनास्थळी सुरक्षा दलांना पाठविण्यात आल्याचे तालिबानचा प्रवक्ता बिलाल करीमीने सांगितले आहे. या स्फोटांची जबाबदारी आतापर्यंत कुठल्याच संघटनेने स्वीकारलेली नाही. आयएसआयएलशी संबंधित दहशतवाद्यांनी रुग्णालयात प्रवेश करत सुरक्षा कर्मचाऱयांशी संघर्ष केल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या कुंदुजमध्ये नमाजादरम्यान स्फोट झाला होता. या स्फोटात 100 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते. हा स्फोट हजारा शिया मशिदीला लक्ष्य करत घडवून आणला गेला होता.









